तनिषाच्या मृत्यूला मंगेशकर रुग्णालय जबाबदार, राहू–केतू डोक्यात आले आणि डॉक्टरांनी 10 लाखांचे डिपॉझिट मागितले; हॉस्पिटलचे अजब तर्कट

तनिषा भिसे या गर्भवती महिलेला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आणल्यानंतर रक्तस्राव होत असतानाही तब्बल साडेपाच तास त्यांच्यावर उपचार करण्यात आले नाहीत, अशी धक्कादायक बाब राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालातून समोर आली आहे. रुग्णालयाने त्यांना 10 लाख रुपये डिपॉझिट भरण्यास सांगितले. रुग्णालयाने नियमांचे पालन केले नाही. भिसे यांच्या मृत्यूला रुग्णालय जबाबदार असल्याचा ठपकाही समितीने ठेवला आहे.

तनिषा भिसे यांना वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने आरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. डॉ. कल्पना कांबळे, डॉ. नागनाथ येम्पल्ले, डॉ. नीना बोराडे, डॉ. प्रशांत वाडीकर यांचा समावेश असलेल्या या समितीने दिलेल्या अहवालात दीनानाथ रुग्णालयावर ठपका ठेवला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी सोमवारी याप्रकरणी पोलीस आयुक्त कार्यालयात शहरातील धर्मादाय रुग्णालय आणि महिला सुरक्षेबाबत आढावा बैठक घेतली. बैठकीला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर चाकणकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रकरणात दिनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी असल्याचे त्यांनी सांगितले.

चाकणकर म्हणाल्या, ‘आढावा बैठक घेण्याआधी मी भिसे कुटुंबीयांची भेट घेतली. कोणतीही व्यक्ती पिंवा रुग्ण डॉक्टरांशी अनेक गोष्टी शेअर करतो, जेणेकरून डॉक्टरांकडून उत्तम उपचार मिळावेत. 15 मार्च रोजी पहिल्यांदा रुग्ण डॉ. घैसास यांना भेटले होते. रुग्णाची संपूर्ण मेडिकल हिस्ट्री फक्त डॉक्टरांना माहीत होती; परंतु ही घटना घडल्यानंतर रुग्णालयाने चौकशीसाठी जी अंतर्गत समिती नेमली होती, त्या समितीचा अहवाल दिला त्यात स्वतःला वाचवण्यासाठी जाहीररीत्या रुग्णाची गोपनीय माहिती सोशल मीडियावर मांडली. ही माहिती गोपनीय ठेवण्याचा नियम आहे. याप्रकरणी आम्ही रुग्णालयाचा निषेध करतो.’

‘संबंधित रुग्णाला 2 एप्रिलला बोलाविण्यात आले होते. पण 28 मार्चला तनिषा भिसे या गर्भवती महिलेला रक्तस्राव होऊ लागल्याने त्यांनी डॉक्टरांशी संपर्क साधला. त्यानुसार त्यांनी रुग्णालयात येण्यास सांगितले. तेथे गेल्यानंतर रक्तस्राव होत असतानाही त्यांच्यावर साडेपाच तास उपचार करण्यात आले नाहीत. मंत्रालयातून आणि इतर विभागांतून फोन गेले, तरीही याची दखल घेतली नाही. त्यानंतर दुपारी अडीच वाजता रुग्ण बाहेर पडली. त्यानंतर ससून आणि शेवटी सूर्या हॉस्पिटल येथे महिलेला दाखल करून घेण्यात आले. 31 मार्चला तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला.’

दोन समित्यांचे अहवाल बाकी, त्यानंतर कायदेशीर कारवाई
राज्य शासनाने नेमलेल्या आरोग्य समितीचा अहवाल आला आहे. समितीने दीनानाथ रुग्णालय, ससून रुग्णालय आणि सूर्या रुग्णालय यांचे अहवाल यात दिले आहेत. हा मृत्यू मातामृत्यू असल्याने यासंदर्भातील सखोल चौकशी मातामृत्यू अन्वेषण समितीअंतर्गत करण्यात येणार आहे. यामध्ये सर्व बाबी तपासून अंतिम अहवाल आज सायंकाळी जाहीर होईल. तसेच धर्मादाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून, त्याचा अहवाल आज सकाळपर्यंत सादर होईल. त्यामुळे हे दोन अहवाल आल्यानंतर पुढे कायदेशीर कारवाई केली जाईल.

ऑपरेशनसाठी नेण्यापूर्वी 10 लाखांची मागणी
सकाळी 9 वाजून 1 मिनिटाने तनिषा भिसे या रुग्णालयात आल्या होत्या. त्यांना रक्तस्राव होत असल्याने स्टाफने ऑपरेशनचीही तयारी केली. मात्र, रुग्णाला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाण्यापूर्वी त्यांच्याकडे डिपॉझिट म्हणून 10 लाखांची मागणी केली गेली. तोपर्यंत त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले नाहीत. त्याउलट ‘तुमच्याकडे गोळ्या असतील तर त्या खा,’ असे सांगण्यात आल्याची माहिती चाकणकर यांनी दिली.

आमच्याकडे डॉक्टर कोणत्याही रुग्णाकडून डिपॉझिट मागत नाहीत. तशी पद्धतच आमच्याकडे नाही. रुग्णालयाकडून खर्चाचे अंदाजपत्रक प्रत्येक रुग्णाला दिले जाते. त्यावरही डिपॉझिट लिहिण्याची पद्धतच नाही. मात्र, त्यादिवशी राहू-केतू डोक्यात आले आणि डॉक्टरांनी दहा लाखांच्या डिपॉझिटची रक्कम लिहून दिली, असे सांगत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी रुग्णालयाच्या चुकीचे खापर राहू-केतूवर फोडत पत्रकार परिषदेत अजब तर्कट मांडले. कामाचा ताण जास्त असल्याने जी संवेदनशीलता किंवा माधुर्य कधीकधी कमी होते. ते टाळण्यासाठी कर्मचाऱ्यां ट्रेनिंग देत आहोत, असे ते म्हणाले. तसेच पत्रकारांकडून प्रश्नांचा भडीमार होताच डॉ. केळकर यांनी पत्रकार परिषद गुंडाळून पळ काढला. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणातील वादग्रस्त मानद स्त्रीरोग व प्रसूतीतज्ञ डॉ. सुश्रुत घैसास यांनी अखेर पदाचा राजीनामा दिला.