
उत्तर प्रदेशमधील मेरठ शहरात एका विवाहित महिलेने तिच्या प्रियकरासोबत मिळून पतीची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या केली होती. या प्रकरणी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांना अटक केली होती. हे दोघेही तुरुंगात असताना आरोपी महिला मुस्कानची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. या चाचणीत ती गर्भवती असल्याचे आढळून आले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
वरिष्ठ तुरुंग अधिक्षक वीरेश राज शर्मा यांनी या प्रकरणी सविस्तर माहिती दिली आहे. तुरुंगात येणाऱ्या प्रत्येक महिला कैद्याची आरोग्य तपासणी आणि गर्भधारणा चाचणी नियमितपणे केली जाते. मुस्कानची चाचणी देखील या प्रक्रियेचा एक भाग होती. अद्याप डॉक्टरांचा अहवाल मिळालेला नाही. मात्र मुस्कान गर्भवती असल्याची तोंडी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
मुस्कानची प्राथमिक चाचणी करण्यात आली, ज्यामध्ये ती गर्भवती असल्याचे निश्चित झाले. या पुढची चाचणी ही अल्ट्रासाऊंड चाचणी असेल, जी गर्भधारणेची स्थिती आणि कालावधी स्पष्ट करेल, अशी माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक कटारिया यांनी दिली.
दरम्यान, दोन्ही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मुस्कान तुरुंगात शिवणकाम करते, तर साहिल शेतीच्या कामात मदत करत आहे. दोघांनाही व्यसनमुक्ती केंद्राच्या मदतीने पुनर्वसन प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आले आहे.