
सौदी अरबने जगातील एकूण 14 देशांच्या व्हिसावर बंदी घातली आहे. ही बंदी सुरक्षेच्या कारणावरून घातली असून ही तात्पुरत्या स्वरूपाची बंदी आहे. सौदीच्या या निर्णयाचा फटका हिंदुस्थान, पाकिस्तान, बांगलादेश, इराकसह एकूण 14 देशांना बसणार आहे. सौदी अरबने आगामी हज यात्रेची सुरक्षा निश्चित करण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत.
हज यात्रेच्या निमित्ताने हिंदुस्थान, पाकिस्तानसह जगातील 14 देशांतील लोक सौदी अरबमध्ये येतात. परंतु ते परत जात नाहीत. ते सौदीमध्ये बेकायदेशीर वास्तव्य करतात, असे सौदी अरबने म्हटले आहे. सौदीतील अवैध प्रवास रोखण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे.
सौदीतील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सौदी अरबने 13 एप्रिलपर्यंत हज व्हिसा अर्ज स्वीकारण्यास बंदी घातली आहे. यानंतर हज यात्रा संपेपर्यंत कोणताही नवीन व्हिसा जारी केला जाणार नाही. हज यात्रेवेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी आणि अवैध प्रवास रोखण्यासाठी सरकारने उचललेले हे पाऊल आहे, असे सौदीने म्हटले आहे. यासोबत सौदी अधिकाऱ्यांनी हज यात्रेसाठी एक डिजिटल गाईडसुद्धा लाँच केली आहे. जी वेगवेगळ्या 16 भाषेत उपलब्ध करण्यात आली आहे.
सौदीमध्ये येणाऱ्या पर्यटकांना हज यात्रेवेळी याची मदत होऊ शकेल. 2024 च्या हज यात्रेवेळी 1 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. यात पाकिस्तानातील नागरिकांची मोठी संख्या होती. 2025 मध्ये हज यात्रेवेळी कोणतेही दुर्घटना होऊ नये, यासाठी आतापासूनच खबरदारी घेतली जात आहे. असे सौदी अरबने म्हटले आहे. सौदीने 14 पैकी 13 देशांची यादी प्रसिद्ध केली असून एका देशाचे नाव अद्याप जाहीर केले नाही. नियमांचे उल्लंघन करून सौदीमध्ये बेकायदेशीर प्रवेश केल्यास त्या व्यक्तीला पाच वर्षांसाठी सौदीत प्रवेश करण्यापासून बंदी घातली जाईल.
कोणत्या देशांच्या व्हिसावर बंदी
- हिंदुस्थान
- पाकिस्तान
- बांगलादेश
- इजिप्त
- इंडोनेशिया
- इराक
- नायजेरिया
- जॉर्डन
- अल्जेरिया
- सुदान
- इथियोपिया
- तूनिशिया
- यमन