
केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ केली आहे. ही दरवाढ सामान्य ग्राहकांसह प्रधानमंत्री उज्वला योजनेतील लाभार्थ्यांनाही लागू असेल. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सोमवारी दुपारी ही माहिती दिली. यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडणार आहे.
ही दरवाढ 8 एप्रिलपासून लागू होणार आहे. सामान्य ग्राहकांना 803 रुपयांना मिळणारा गॅस सिलेंडर आता 853 रुपयांना मिळेल. तर प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत 500 रुपयांना सिलेंडर आता 550 रुपयांना मिळेल. याशिवाय सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढवण्याचाही निर्णय घेतला आहे.