“तु तर भिकारी आहेस”, बुट चोरण्यावरुन झाला राडा; 50 हजार दिले नाही म्हणून नवरदेवासह कुटुंबाला चोपलं

लग्न करुन नवीन आयुष्याची सुरुवात करण्याची स्वप्न पाहणाऱ्या एका नवरदेवाला नवरीच्या कुटुंबीयांनी घरात बंद करून बेदम चोप दिल्याची धक्कादायक घटना देहरादूनमध्ये घडली आहे. बुट चोरण्यावरुन झालेला वाद विकोपाला गेला आणि त्याचे रुपांतर हाणामारीत झाले.

देहरादूनच्या चकरता येथे वास्तव्यास असणाऱ्या मोहम्मद साबिर याचे लग्न गढमलपुर गावातील एका मुलीशी ठरले होते. शनिवारी दोघांचा विवाह नातेवाईकांच्या उपस्थिती मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. त्यानंतर लग्नाचे विधी सुरू झाले. विधी सुरू असताना मुलीकडच्यांनी नवरदेवाचे बुट चोरण्याचा प्रयत्न केला आणि बुट चोरला आणि बुट परत करण्यासाठी 50 हजार रुपयांची मागणी केली. नवरदेवाने आपण 50 हजार रुपये देण्यास असमर्थ असल्याचे सांगितले आणि 5 हजार रुपये देण्याची तयारी दर्शवली. याच वेळी नवरीच्या कुटुंबातील काही महिलांनी “तु तर भिकारी आहेस,” अशा पद्धतीचे वक्तव्य केले आणि यावरुन दोन्ही कुटुंबांमध्ये वादाची ठिणगी पडली.

दोन्ही कुटुंबांमधील झालेल्या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. नवरीच्या कुटुंबीयांनी नवरदेवाच्या कुटुंबाला आणि नातेवाईकांना एका खोलीत बंद करुन बेदम चोप दिल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे लग्नाची वरात घरी जाण्याएवजी पोलीस स्थानकात जाऊन धडकली. याप्रकरणी दोन्ही कुटुंबीयांनी एकमेकांवर आरोप केले आहेत. पोलीस अधिकारी नितेश प्रताप सिंह या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.