शिवशंभूद्रोही प्रशांत कोरटकरला कारागृहातच बजावली अब्रुनुकसानीची नोटीस; अडचणीत वाढ

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांविषयी गरळ ओकणाऱ्या नागपूरच्या प्रशांत कोरटकरला तुरुंगातच अब्रुनुकसानीची नोटीस बजावण्यात आली आहे. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी ॲड.असीम सरोदे यांच्यातर्फे कोल्हापूर कारागृहाच्या पत्यावरच कोरटकरला अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस बजावण्यात आली. त्यामुळे सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या कोरटकरच्या अडचणी वाढल्या आहेत.

24 फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देताना, नागपूरच्या प्रशांत कोरटकरने राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकराक वक्तव्य केले होते. त्याविरोधात दुसऱ्या दिवशी कोल्हापूरातील जुना राजवाडा पोलिस ठाण्यात इंद्रजित सावंत यांनी गुन्हा दाखल केला होता.त्यानंतर राज्यभर तीव्र संतापाची लाट उसळली होती.गृहखात्याने पोलिस संरक्षण दिले असतानाही कोरटकर महिनाभर‌ पळून गेला होता. 25 मार्च रोजी कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणातून मुसक्या आवळून येथील न्यायालयात हजर केले असता पहिल्यांदा पाच दिवसांची त्यानंतर दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.सध्या 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या कोरटकरची रवानगी कळंबा मध्यवर्ती कारागृहात असली तरी जामिनासाठी त्याचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान विविध न्यायालयात प्रशांत कोरटकरने दाखल केलेल्या जामीन अर्जात त्याने इतिहास संशोधक इंद्रजित यांनी अनेकदा स्वतःच छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान केला असून,इंद्रजित सावंत यांच्यावरच सामाजिक तेढ निर्माण करण्याबाबतचे गुन्हे नोंद आहेत,तसेच त्यांना अटक झाली होती,अशी खोटी माहिती दिली होती. त्यातून इंद्रजीत सावंत यांची बदनामी करण्यात येत असल्याचा आक्षेप न्यायालयात केल्यावर कोरटकरतर्फे ते परिच्छेद रद्द करीत असल्याचे न्यायालयासमोर लेखी स्वरूपात सांगण्यात आले होते.यासंदर्भात आता इंद्रजित सावंत यांच्याकडून प्रशांत कोरटकरला ॲड. असीम सरोदे यांच्यातर्फे कळंबा कारागृहाच्या पत्यावरच अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस बजावण्यात आली.ॲड.योगेश सावंत यांनी स्वतः या कारागृहात जाऊन इंद्रजित सावंत यांच्यातर्फे प्रशांत कोरटकर याला अब्रुनुकसानीची नोटीस जेलर अविनाश भोई यांच्या हस्ते देण्यात आली.त्यामुळे कोरटकरच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.