अक्षय शिंदे एन्काऊंटरचा तपास SIT कडे; जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे नोंदवण्याचे हायकोर्टाचे आदेश

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणी पोलिसांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अक्षय शिंदे याच्या मृत्यूला जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाचा तपास सीआयडीकडून विशेष तपास पथकाकडे सोपवण्यात आला आहे. मुंबई गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त लखमी गौतम यांच्या देखरेखीखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात येणार असून हे विशेष पथक अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटरचा तपास करेल.

अक्षय शिंदेच्या मृत्यूचा तपास सध्या राज्य सीआयडीमार्फत सुरू होता. त्यामुळे राज्य सीआयडीने पुढील दोन दिवसांत तपासाची सर्व कागदपत्रे विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) सादर करावीत आणि एसआयटीने कायद्याला धरून या प्रकरणाचा सखोल तपास करावा, असे आदेश न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने दिले आहेत. सुनावणीवेळी याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. अमित कटारनवरे, अ‍ॅड. पूजा डोंगरे आणि अ‍ॅड. आदित्य कटारनवरे यांनी बाजू मांडली.

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाची सगळ्या बाजूंनी चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी राज्य सरकारने या निर्णयाला दोन आठवड्यांची स्थगिती देण्याची मागणी केली, मात्र मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारची ही मागणी फेटाळली.