जम्मू-कश्मीर विधानसभेत गदारोळ; वक्फ विधेयकाच्या प्रति फाडल्या, आमदारानं स्वत:चा कोट फाडून हवेत फिरवला

केंद्र सरकारने नव्याने लागू केलेल्या वक्फ कायद्यावरून जम्मू-कश्मीर विधानसभेमध्ये सोमवारी प्रचंड गदारोळ उडाला. नॅशनल कॉन्फरन्सने वक्फ कायद्याविरोधात स्थगन प्रस्ताव आणण्याची मागणी केली. मात्र विधानसभा अध्यक्षांनी याला अनुमती न दिल्याने सत्ताधारी पक्षातील आमदारांनी प्रचंड गोंधळ घातला. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाचे स्वागत केले. यावेळी नॅशनल कॉन्फरन्सच्या आमदारांनी ‘वक्फ बिल नामंजूर, वक्फ बिल नामंजूर’ अशी घोषणाबाजीही केली.

विधानसभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी नॅशनल कॉन्फरन्ससह अन्य पक्षाच्या आमदारांनी एक बैठक घेतली. यात वक्फ कायद्याविरोधात स्थगन प्रस्ताव आणण्यावर चर्चा झाली. विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार तनवीर सादिक यांनी वक्फ कायद्याविरोधात स्थगन प्रस्ताव आणण्याची मागणी केली, मात्र विधानसभा अध्यक्षांनी ही मागणी फेटाळल्याने सदनात गोंधळ उडाला. यामुळे विधानसभा अध्यक्षांनी 15 मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले.

कामकाज सुरू झाल्यानंतरही नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार सभागृहाच्या वेलमध्ये उतरले आणि ‘मोदी सरकार हाय हाय..’ अशी घोषणाबाजी केली. यावेळी आमदारांनी वक्फ विधेयकाच्या प्रतिही फाडल्या. याच दरम्यान नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार अब्दुल मजिद लार्मी यांनी स्वत:चाच काळा कोट फाडत हवेत गरागरा फिरवला आणि वक्फ कायद्याचा निषेध केला.