उल्हासनगर महापालिकेत मायबोली मराठीचा गजर; 303 दालनांचे क्रमांक, फलक मराठीत

उल्हासनगर महापालिकेत आता गजर मराठीचा सुरू झाला आहे. महापालिका मुख्यालयात असलेल्या 303 दालनांचे क्रमांक मराठी झळकवण्यात आले असून दिशादर्शक फलक आणि अधिकाऱ्यांच्या नावाच्या पाट्याही मराठीमध्ये लिहिण्यात आल्या आहेत. महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या दालनाला 115 वा क्रमांक देण्यात आला आहे.

उल्हासनगर महापालिकेची स्थापना 1996 साली झाल्यावर पालिकेच्या या इमारतीत पूर्वी मराठी आणि इंग्रजीतील दिशादर्शक फलक लावण्यात आले होते. मात्र अनेकदा अधिकाऱ्यांची वा विविध विभागांची दालने इकडून तिकडे स्थलांतरित होत असली तरी दिशादर्शक फलकांवर ती नावे जैसे थे ठेवण्यात आल्याने नागरिकांची दिशाभूल होत होती. महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी जानेवारी महिन्यात आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर दिशादर्शक फलकांचा आणि सर्व अधिकारी, विभाग यांच्या दालनांना मराठी क्रमांक देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार भांडार विभागाने सर्व दालनांचे क्रमांक मराठी लिहीले आहेत.

नागरिकांचा त्रास कमी होणार
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्या अनुषंगाने दिशादर्शक फलक आणि दालनांचे क्रमांक हे मराठीत करण्यात आले आहेत. हे सर्व प्रथमदर्शनी असल्यामुळे अभ्यागतांना अधिकाऱ्यांची, विविध विभागांची दालने शोधावी लागणार नाहीत. महापालिका मुख्यालयात येणाऱ्या नागरिकांना त्रास कमी होणार आहे अशी प्रतिक्रिया महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी व्यक्त केली आहे.