गद्दारांना धडा शिकवून पुन्हा भगवा फडकवू; रायगडातील शिवसैनिकांचा निर्धार

रायगडला लागलेला गद्दारीचा कलंक पुसून टाकून रायगड जिल्हा पुन्हा भगवामय करून दाखवू, असा निर्धार शिवसैनिकांनी शनिवारी केला. रायगडमधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांची बैठक दादरच्या पर्ल सेंटर येथे पार पडली. यावेळी शिवसैनिकांनी गद्दारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

दक्षिण रायगडमधील पदाधिकारी व शिवसैनिक यांची आढावा बैठक शनिवारी मुंबईत पार पडली. या बैठकीत शेकडो शिवसैनिकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे जाहीर केले. दक्षिण रायगडचे जिल्हा संपर्कप्रमुख नागेंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाप्रमुख नंदू शिर्के यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीला सहसंपर्कप्रमुख दिलीप करंदीकर, संपर्कप्रमुख सुजित तांदळेकर, चंद्रकांत धोंडगे, कृष्णा कदम, जिल्हा महिला संघटक ज्योत्स्ना दिघे, उपजिल्हा संघटक सायली सुखदरे, स्वाती घोसाळकर, ज्योती मनवे, अमित मोरे, अजिंक्य नाईक, योगेश गायकर, सुनील जाईलकर आदी जण उपस्थित होते.

पापाचा घडा लवकरच भरणार
गद्दारांच्या पापाचा घडा लवकरच भरणार असून यापुढे कोणत्याही शिवसैनिकांवर जर दादागिरी करत असतील तर त्या शिवसैनिकांसाठी मी स्वतः गावात येऊन विरोधकांना उत्तर देणार, असा इशारा संपर्कप्रमुख नागेंद्र राठोड यांनी यावेळी दिला. तसेच आगामी निवडणुकीत रायगड जिल्ह्यात गद्दारांना धूळ चारणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.