सपा नेते विनय शंकर तिवारी यांच्या घरावर ईडीचे छापे; पीएमएलए कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल

उत्तर प्रदेशात ईडीने समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी आमदार विनय शंकर तिवारी यांच्या गंगोत्री एंटरप्रायझेसच्या कार्यालयांवर छापे टाकले आहेत. लखनऊ, गोरखपूर आणि मुंबई येथील गंगोत्री एंटरप्रायझेसच्या कार्यालयांवर हे छापे टाकण्यात आले आहेत. 1500 कोटी रुपयांच्या बँक कर्ज घोटाळ्याची सीबीआय चौकशी आधीच सुरू आहे. आता ईडीने पीएमएलए कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल केला आहे.

बसपाचे आमदार असताना हरिशंकर तिवारी यांचे पुत्र विनय शंकर तिवारी यांनी गंगोत्री एंटरप्रायझेसच्या नावाने अनेक बँकांकडून कर्ज घेतले होते. बँक ऑफ इंडियाच्या क्लस्टरमध्ये कर्ज देणाऱ्या बँकेने तक्रार केली होती. त्यानंतर सीबीआयने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. त्याचबरोबर आता ईडीने मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. याप्रकरणाबाबत ईडीने ही कारवाई केली आहे. त्यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकण्यात आले.

ईडीच्या अनेक नोटिसा देऊनही विनय शंकर तिवारी जबाबासाठी हजर राहत नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर, सोमवारी पहाटे ईडीच्या पथकांनी तिवारींच्या सर्व ठिकाणी छापे टाकले. पथकाने सुमारे 4 तास चौकशी केली आणि माहिती गोळा केली. विनय हा 1985 ते 2007 पर्यंत वेगवेगळ्या सरकारांमध्ये आमदार आणि मंत्री असलेले दिग्गज नेते हरिशंकर तिवारी यांचा मुलगा आहे. एकेकाळी तिवारींचा संपूर्ण पूर्वांचलमध्ये मोठा प्रभाव होता. पण काळानुसार राजवट बदलली आणि तिवारी कुटुंबाचा प्रभावही कमी होऊ लागला. सध्या तिवारी कुटुंब आणि उत्तर प्रदेश सरकारमध्ये वैर आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत असल्याची चर्चा आहे.