
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांमुळे जगभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. आता अमेरिकेतही ट्रम्प यांच्या मनमानी कारभाराविरोधात अमेरिकी जनता रस्त्यावर उतरली आहे. त्यातच ट्रम्प यांनी आपण तिसरा कार्यकाळही भूषवणार असून त्याबाबत कायदेशीर आणि संवैधानिक तरतूदींचा अभ्यास सुरू असल्याचे स्पष्ट केले होते. आपल्याला तिसरी टर्म मिळावी, असे त्यांचे स्वप्न होते. मात्र, त्यांच्या या स्वप्नावर पाणी पडले असून अमेरिकेचे अटर्नी जनरल पाम बोंडी यांनी याबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी तिसऱ्या कार्यकाळासाठी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांचे हे वक्तव्य अनेकांना स्वप्नरंजन किंवा ट्रम्प मस्करी करत असतील असे वाटले. मात्र, आपण हे वक्तव्य गांभीर्याने करत असून तिसऱ्या टर्मसाठी कायदेशीर आणि संवैधानिक बाबींचा अभ्यास करत असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, अमेरिकेचे अॅटर्नी जनरल पाम बोंडी यांनी रविवारी सांगितले की डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्षपदच्या तिसऱ्या कार्यकाळासाठी निवडणूक लढवणे हे कायदेशीर आव्हान असून त्यावर मार्ग शोधणे कठीण असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ट्रम्प यांचा कार्यकाळ या त्यांच्या दुसऱ्या टर्मनंतर संपणार आहे, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
ट्रम्प हे दूरदृष्टी असणारे नेते आहेत. त्यांना आपण 20 वर्षेही आपले अध्यक्ष म्हणून ठेवू शकतो. मात्र, यात अनेक कायदेशीर अडचणी आहेत. यासाठी अनेक कायदेशीर मोठे बदल करावे लागतील आणि ते मोठे आव्हान असेल. त्यामुळे ट्रम्प यांचा कार्यकाळ या टर्मनंतर संपणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. अमेरिकेचे माजी राष्ट३ध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट यांचा व्हाईट हाऊसमधील चौथा कार्यकाळ सुरू होण्यापूर्वी 1947 मध्ये अमेरिकेच्या संविधानात राष्ट्राध्यक्षपदासाठी दोन टर्मची मर्यादा निश्चित करत संविधानात सुधारणा करण्यात आली.
आता ट्रम्प यांना तिसरा कार्यकाळ भूषवायचा असेल तर घटनात्मक सुधारणांसाठी काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांच्या दोन तृतीयांश बहुमताने मान्यता आवश्यक आहे. तसेच 50 राज्यांपैकी तीन चतुर्थांश राज्यांनी मान्यता देणे आवश्यक आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते ही अशक्य बाब आहे. ट्रम्प यांना आता अमेरिकेतूनही विरोध होत आहे. त्यामुळे हा बदल अशक्य असल्याचे दिसत असल्याचेही बोंडी यांनी स्पष्ट केले.
अॅटर्नी जनरल बोंडी यांनी ट्रम्प यांच्या तिसऱ्या टर्मच्या अडचणींबद्दल केलेले भाष्य घटनात्मक विद्वानांच्या मतांशी मिळतेजुळते आहे. मात्र, सर्वोच्च कायदा अंमलबजावणी कार्यालयात असलेल्या ट्रम्प यांच्या निष्ठावंत म्हणून त्यांच्या टिप्पण्या अधिक महत्त्वाच्या आहेत. फॉक्सच्या शॅनन ब्रीमला दिलेल्या मुलाखतीत बोंडी यांनी ट्रम्प प्रशासनाला त्यांच्या धोरणांना लागू करण्यासाठी आक्रमकपणे जाण्यात अनेक कायदेशीर अडचणी असल्याचे स्पष्ट केले.
आमच्यावर 170 हून अधिक खटले दाखल झाले आहेत. तेच सर्वात मोठे घटनात्मक संकट आहे. मात्र, आम्ही ते खटले लढवत राहू आणि विजय मिळवू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मात्र, ट्रम्प यांच्या तिसऱ्या कार्यकाळाबाबत बोंडी यांचे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे.