
मुजफ्फरनगर जिल्ह्यात शुक्रवारच्या नमाजादरम्यान मशिदीत काळी पट्टी बांधून वक्फ सुधारणा विधेयकाविरोधात आंदोलन करणाऱ्या तब्बल 300 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. प्रत्येकी 3 लाख रुपयांचे बॉण्ड भरण्याचेही आदेश दिले आहेत.
सीसीटीव्ही फुटेज तपासून आंदोलनात सहभागी असणाऱयांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. आणखी काही लोकांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सत्यनारायण प्रजापत यांनी आज दिली. मात्र, पोलिसांनी दिलेल्या अहवालानुसार अशा प्रकारच्या नोटिसा 24 जणांना बजावण्यात आल्या असून त्यांना 16 एप्रिल रोजी न्यायालयात हजर करण्यापूर्वी प्रत्येकी 2 लाख रुपयांचा बॉण्ड भरण्यास सांगण्यात आल्याचे शहर महानगर दंडाधिकारी विकास कश्यप यांनी सांगितले.
28 मार्च रोजी शुक्रवारच्या नमाजादरम्यान विविध मशिदींमध्ये मुस्लिम नागरिकांनी काळी पट्टी बांधून वक्फ विधेयकाविरोधात आंदोलन केले होते. त्या सर्वांवर कारवाई करण्यात आल्याचे प्रजापती यांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांकडून मनमानी कारवाई सुरू असून, वक्फविधेयकाला मुस्लिमांचा विरोधच राहील असे उत्तर प्रदेशात विविध ठिकाणी आंदोलन करणाऱया मुस्लिम नागरिकांनी सांगितले.