दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर पोप यांची सार्वजनिक ठिकाणी उपस्थिती

ख्रिस्ती धर्मगुरू पोप फ्रान्सिस (88) दोन आठवड्यांपूर्वी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर व्हॅटिकनमध्ये पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी उपस्थित राहिले. आज आरोग्य कर्मचारी आणि आजारी लोकांसाठी आयोजित कार्यक्रमात ते व्हीलचेअरवर बसले होते. त्यांचा सेंट पीटर स्क्वेअरमध्ये अचानक प्रवेश झाल्याने एकच चर्चा रंगली. त्यांना वेदीसमोर आणले जात असताना उपस्थित असलेल्या लोकांनी उभे राहून टाळ्या वाजवत पोप यांचे स्वागत केले.

‘सर्वांना शुभ रविवार, खूप खूप धन्यवाद,’ असे पोप यांनी उपस्थितांना उद्देशून म्हटले. डबल न्यूमोनियाशी झुंज दिल्यानंतर 23 मार्च रोजी पोप यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. पाच आठवडे त्यांच्यावर उपचार सुरू होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी दोन आठवडे विश्रांती घेतली.