
<<< क्रीडा प्रतिनिधी >>>
पहिल्या दोन पराभवानंतर मुंबई इंडियन्सच्या विजयाचे खाते वानखेडेवरच उघडले गेले होते. आता पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सला आपल्या घरच्या खेळपट्टीवर त्याच विजयाची प्रतीक्षा आहे. चारपैकी तीन सामने गमावले असले तरी जसप्रीत बुमराच्या पुनरागमनाने मुंबई इंडियन्सचे मनोधैर्य उंचावले आहे आणि त्याच धैर्यावर विजयाचे ध्येय गाठण्यासाठी सज्ज झाले आहेत.
आयपीएलचा झंझावात सुरू होऊन दोन आठवडे उलटून गेले तरी मुंबई इंडियन्सचे दिग्गज अद्याप ट्रॅकवर आलेले नाहीत. गेल्या मोसमात जसा धसमुसळा खेळ मुंबईच्या खेळाडूंनी केला होता, आताही तीच री ओढत असल्याचे दिसत आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने तळाची कामगिरी करत सर्वांची निराशा केली होती. 14 पैकी केवळ 4 सामन्यांतच मुंबईला विजयाचा धावा करता आला होता. म्हणजे दहा सामन्यांत मिळालेली हार मुंबईला सर्वप्रथम बाद करणारी ठरली. गेल्या वर्षीची नामुष्की मुंबई यावेळी टाळेल अशीच साऱ्यांना अपेक्षा होती, पण पंड्याला ते यंदाही अद्याप साधता आलेले नाही.
मुंबईला दिग्गजांच्या विराट खेळाची अपेक्षा
हिंदुस्थानी क्रिकेटचे दोन आधारस्तंभ म्हणजे रोहित शर्मा आणि विराट कोहली आज वानखेडेवर उतरणार आहेत. कोहलीच्या बॅटला काहीसा सूर गवसलेलाय, मात्र रोहितची बॅट अजूनही बेसुरीच आहे. सामना मुंबईने जिंकावा अशी मुंबईकरांची इच्छा असली तरी त्यांना वानखेडेवर रोहित आणि कोहलीचा विराट खेळ पाहायचाय. दोघांची जुगलबंदी पाहायचीय. हल्ली फार क्वचितच हे दृश्य दिसलेय. सलामीला उतरून रोहितने षटकारांची बरसात करावी आणि विराटने मुंबईच्या गोलंदाजांना फोडावे, याचीच सारे वाट पाहताहेत.
बुमरा आला रे…
ज्या गोलंदाजाची भीती जगातील फलंदाजांच्या मनात आहे तो जसप्रीत बुमरा पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात उतरतोय. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी कसोटीत पाठीत उसण भरल्याने मैदानाबाहेर गेलेला बुमरा आता तीन महिन्यांच्या दीर्घ विश्रांतीनंतर क्रिकेटच्या मैदानावर परतला आहे. शनिवारी त्याने मुंबईसाठी उपलब्ध असल्याचे जाहीर केले आणि संघासोबत सरावही केला. त्यामुळे मुंबई पुन्हा एकदा जोशात वानखेडेवर उतरेल. बुमराच्या अनुपस्थितीत हिंदुस्थानने सिडनी कसोटी गमावली होती. एवढेच नव्हे तर चॅम्पियन्स ट्रॉफीतही तो हिंदुस्थानी संघात नव्हता. गेल्या चार सामन्यांत मुंबईच्या गोलंदाजीची धार तीक्ष्ण झाली आहे, मात्र ती मुंबईला विजयासमीप नेऊ शकलेली नाही. बुमराच्या पुनरागमानने मुंबईचा विजयाचा काळही परतेल, अशी अपेक्षा आहे.
फलंदाजांमुळे मुंबई शर्यतीत मागे
मुंबई इंडियन्सने गेल्या चार सामन्यांत आपल्या म्यानातून काढलेल्या विघ्नेश पुथुर आणि अश्वनी कुमार या पदार्पणवीरांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. एकीकडे गोलंदाज मुंबईसाठी झगडताना दिसत आहेत, तर दुसरीकडे फलंदाजांनी सर्वांनाच निराश केलेय. लखनौविरुद्ध तर मुंबई हमखास विजय मिळवेल, असे साऱ्यांचे अंदाज तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्याने फोल ठरवले. यात लखनौच्या शार्दुल ठाकूर, आवेश खान आणि दिग्वेश राठी यांनी शेवटच्या क्षणी केलेल्या भन्नाट माऱ्याने मुंबईच्या धडाकेबाजांना एकेका धावेसाठी रडवले होते. तेच मुंबईच्या पराभवाचे मुख्य कारणीभूत होते. कसोटी आणि वन डे मालिकेत ज्या पद्धतीने रोहित शर्माचे फलंदाजीतले अपयश हिंदुस्थानी संघाला बोचत होते. आता तशीच स्थिती मुंबईची झालीय. गेल्या तीन सामन्यांत रोहितच्या बॅटमधून 0, 8, 13 अशा डोकेदुखी वाढवणाऱ्या खेळ्या निघाल्या आहेत. या धावांमुळे मुंबईच्या संघव्यवस्थापनाचा संघनिवडीचाही मनःस्ताप वाढला आहे. सूर्यकुमार यादव असो किंवा हार्दिक पंड्या, मुंबईचे सारेच फलंदाज लॉटरी ठरताहेत. लागली तर लागली.