जोफ्रा आर्चर झोपेतून उठला अन् दोन त्रिफळे उडविले

पहिल्याच सामन्यात आयपीएलच्या इतिहातासातील सर्वात महागडा गोलंदाज ठरलेल्या राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने पंजाब किंग्जविरूद्धच्या लढतीत शनिवारी कमाल केली. आपल्या संघाची फलंदाजी चालू असताना तो डग आऊटमध्ये डाराडूर झोपलेला होता, मात्र झोपेतून उठून गोलंदाजीला उतरल्यानंतर त्याने एकाच षटकात दोन फलंदाजांचे त्रिफळे उडवून पंजाबला बॅकफुटवर ढकलले.

जोफ्रा आर्चरने डावाच्या पहिल्याच चेंडूवर सलामीवीर प्रियांश आर्यचा त्रिफळा उडविला. त्याच्या जागेवर आलेल्या कर्णधार श्रेयस अय्यरने आर्चरला लागोपाठ चौकार ठोकून दडपण झुगारण्याचा प्रयत्न केला, मात्र आर्चरने अखेरच्या चेंडूवर तुफान फॉर्मात असलेल्या श्रेयसचाही त्रिफळा उडवून पंजाबच्या फलंदाजीवर दडपण आणले. या एकाच षटकातील दोन धक्क्यातून पंजाबचा संघ शेवटपर्यंत सावरला नाही. त्यातच जोफ्रा आर्चरने शेवटच्या षटकात अर्शदीप सिंगलाही बाद करीत 25 धावांच्या मोबदल्यात एकूण 3 फलंदाज बाद केले. या एकतर्फी लढतीत राजस्थानला 50 धावांनी विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणारा जोफ्रा आर्चर या विजयाचा मानकरी ठरला.