
हिंदुस्थानच्या हितेश गुलियाने ब्राझील येथे पार पडलेल्या विश्वचषक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. कारण या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा हितेश हा पहिला हिंदुस्थानी बॉक्सर ठरला हे विशेष. हिंदुस्थानी खेळाडूंनी या स्पर्धेत एका सुवर्णासह एकूण सहा पदके जिंकली.
हितेश गुलिया हा 70 किलो गटाच्या सुवर्णपदकाच्या लढतीत इंग्लंडच्या ओडेल कामारा याच्याशी लढणार होता, मात्र कामाराने दुखापतीमुळे अंतिम लढतीतून माघार घेतल्याने हितेशला सुवर्णपदक बहाल करण्यात आले. हिंदुस्थानच्या अभिनाश जामवालने 65 किलो गटात अंतिम फेरी गाठली होती, मात्र संघर्षपूर्ण अंतिम लढतीत त्याला यजमान ब्राझीलच्या युरी रेइस याच्याकडून पराभव पत्करावा लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
याचबरोबर जादुमणी सिंह मंदेंगबाम (50 किलो), मनीष राठोड (50 किलो), सचिन कुमार (60 किलो), विशाल कुमार (90 किलो) या हिंदुस्थानी खेळाडूंनी कांस्यपदकांची कमाई केली. हितेश गुलियाने आपल्या सुवर्णपदकाचे श्रेय स्पर्धेपूर्वी ब्राझीलमध्ये झालेल्या दहा दिवसीय सराव शिबिराला दिले. या स्पर्धेत हिंदुस्थानने दहा खेळाडूंचे पथक उतरविले होते. त्यातील सहा खेळाडूंना पदके मिळाली ही अतिशय चांगली कामगिरी ठरली. या स्पर्धेतील पदकांमुळे आगामी स्पर्धांसाठी खेळाडूंचा आत्मविश्वास वाढेल. आगामी लॉस एंजिलिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेतही (2028) याचा हिंदुस्थानला नक्कीच फायदा होणार आहे.
‘स्पर्धेपूर्वी ब्राझीलमध्ये झालेल्या सराव शिबिरामुळे अनेक बारकावे शिकायला मिळाले. याचबरोबर स्पर्धेपूर्वी तेथील वातावरणाशी जुळवून घेण्यास मदत झाली. जगभरातील प्रतिभावान खेळाडूंचा समावेश असलेल्या या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्यात यशस्वी ठरलो, त्यामुळे सहाजिकच आनंद झालाय अन् मनोबलही उंचावले’, हितेश गुलिया म्हणाले.