
महाराष्ट्रातील रहिवाशी कामावर जास्त वेळ घालवतात. त्यामुळे सामाजिकीकरण, स्वतःची काळजी, शिक्षण यासाठी त्यांच्याकडे वेळ कमी असतो. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने केलेल्या टाईम युज सर्व्हे (टीयूएस) 2024 मधून ही बाब उघड झाली आहे.
सर्वेक्षणानुसार, राज्यातील रहिवाशांनी रोजगार आणि संबंधित कामांवर दररोज सरासरी 469 मिनिटे घालवली आहेत. हे राष्ट्रीय सरासरी 440 मिनिटांपेक्षा खूपच जास्त आहे. रोजगार आणि त्यासंबंधित कामे म्हणजे नोकरी, शेती, मासेमारी, खाणकाम आणि अन्य कामांसाठा पुरुष सरासरी 500 मिनिटे, तर महिला फक्त 395 मिनिटे घालवतात.
स्वयंपाक, साफसफाई, घराची देखभाल, पाळीव प्राण्यांची काळजी, कुटुंबासाठी खरेदी या कामांमध्ये स्त्रिया सरासरी 281 मिनिटे घालवतात, तर पुरुष या कामांमध्ये फक्त 90 मिनिटे घालवतात. झोप, खाणे, पिणे आणि वैयक्तिक स्वच्छता यासह ‘स्व-काळजी’साठी घालवलेला वेळदेखील कमी झाला आहे, जो 715 मिनिटांवरून 709 मिनिटांवर आलाय.