
कोची शहरात घडलेल्या एका घटनेबद्दल सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. पेरुम्बावूर येथील एका खासगी कंपनीत कर्मचाऱ्याला खूप वाईट वागणूक देण्यात आली. कर्मचाऱ्याच्या गळ्यात पट्टा बांधून त्याला कार्यालयात गुडघ्यांवर फिरवण्यात आले. त्याला भांड्यात पाणी देऊन ते श्वानाप्रमाणे पिण्यास भाग पाडले गेले.
एवढेच नाही तर त्याला त्याचे कपडे काढून मारहाणही करण्यात आली. कर्मचाऱ्याने चांगली कामगिरी केली नाही, कामाचे टार्गेट पूर्ण केले नाही म्हणून ही शिक्षा देण्यात आल्याचे समजतेय. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर नेटिजन्स तीव्र संताप व्यक्त करत आहेत.
केरळचे कामगारमंत्री व्ही. शिवनपुट्टी यांनी यासंदर्भात अहवाल मागवला आहे. ते म्हणाले, ‘‘केरळमध्ये कामगार कायद्याची अंमलबजावणी अतिशय काटेकोरणे केली जाते. कोणत्याही परिस्थितीत कामगारांचा छळ सहन केला जाणार नाही. अहवालाच्या आधारे कारवाई केली जाईल.’’