सुदर्शन पटनायक बनले ‘सॅण्ड मास्टर’स यूकेचा पुरस्कार मिळवणारे पहिले हिंदुस्थानी

प्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनाईक यांना कला क्षेत्रातील योगदानाबद्दल यूकेमध्ये ‘द फ्रेड डॅरिंग्टन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वेयमाऊथ येथे झालेल्या सँडवर्ल्ड 2025 इंटरनॅशनल सँड आर्ट फेस्टिवलमध्ये त्यांना ब्रिटिश सँड मास्टर पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले हिंदुस्थानी कलावंत आहेत.

सुदर्शन पटनाईक यांनी जागतिक शांतीचा संदेश देणार भगवान श्रीगणेशाचे 10 फूट उंच वाळूचे शिल्प तयार केले. या वर्षीच्या महोत्सवात अनेक आंतरराष्ट्रीय वाळू कलावंतांनी सहभाग घेत सर्जनशील शिल्पांचे प्रदर्शन केले. यावेळी वेमाऊथ येथील प्रसिद्ध वाळू शिल्पकार फ्रेड डॅरिंग्टन यांच्या 100 व्या जयंतीचे स्मरण करण्यात आले.

वेयमाऊथचे महापौर जॉन ओरेल यांच्या हस्ते सुदर्शन पटनाईक यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. पटनाईक यांनी जगभरातील 65 हून अधिक आंतरराष्ट्रीय वाळू शिल्प स्पर्धा आणि महोत्सवांमध्ये भाग घेतला आहे.