
नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरातील प्रवेशासाठी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आंदोलन केले होते पण तत्कालीन व्यवस्थेने त्यांना मंदिर प्रवेश नाकारला होता. आज रामनवमीचे औचित्य साधत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भारताचा नागरिक या नात्याने बाबासाहेबांनी लिहिलेले पवित्र संविधान हाती घेऊन काळाराम मंदिरात प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नातू कॅप्टन कुणाल गायकवाड, खा. शोभा बच्छाव व शेकडो कार्यकर्त्यांनी प्रभू रामाचे दर्शन घेतले.
आज राम नवमी निमित्त कांग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नाशिक येथील काळाराम मंदिरात प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. यावेळी मंदिराचे महंत तसेच काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहात डॉ आंबेडकर यांच्या सोबत असलेले कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नातू कॅप्टन कुणाल गायकवाड देखील उपस्थित होते. 1930 साली मंदिरात प्रवेशापासून बाबासाहेबांना आणि दादासाहेबांना अडवले होते. पण आज महंतांनी दादासाहेबांचे नातू कॅप्टन कुणाल गायकवाड यांचे मंदिरात स्वागत केले. यावेळी सपकाळ यांनी महंतांना भारतीय संविधानाची प्रत भेट दिली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू राम हे सर्वांचे आहेत, ते भारतीय संस्कृतीचे अविभाज्य अंग आहेत. आज राम नवमीनिमित्त काळाराम मंदिरात जाऊन प्रभू रामाचे दर्शन घेतले व “देशात व राज्यात समतेचा, बंधुत्वाचा व संविधनाचा विचार नांदावा”, अशी कामना व्यक्त केली. या काळाराम मंदिराला मोठा इतिहास आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी 1930 ते 1935 अशी पाच वर्ष 17 दिवस सत्याग्रह केला पण त्यांना मंदिरात प्रवेश नाकारला. यावेळी दंगल होऊन त्यात बाबासाहेब आंबेडकर जखमी झाले होते. दुसऱ्या वर्षी ते गोलमेज परिषदेला गेले असता दादासाहेब गायकवाड, साने गुरुजी यांनी सत्याग्रहाची धुरा सांभाळली पण पाच वर्ष सत्याग्रह करूनही त्यावेळच्या व्यवस्थेने त्यांना प्रवेश दिला नव्हता. त्यामुळे त्यांनी धर्मांतर केले होते. तत्कालीन व्यवस्थेने मंदिराचे चारही दरवाजे बंद करून बाबासाहेबांना प्रवेश नाकारला होता. विद्यमान सरकारही गोरगरीब बहुजनांचे सगळे दरवाजे बंद करून त्यांची विकासाची प्रगतीची संधी हिरावून घेत आहे.
काँग्रेस कार्यकर्ता मेळावा..
नाशिक जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला, यावेळी मेळाव्याला संबोधित करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, देशात महागाई प्रचंड वाढलेली आहे, मराठी शाळा बंद होत आहेत, रोजगार नाहीत पण केंद्र सरकारने एक खेळणे हाती दिले असून आपण हातावर हात ठेवून पहात बसलो आहोत ते म्हणजे वक्फ बोर्ड… इंग्रजांनी दिल्लीत राजधानी वसवण्याचा निर्णय घेतला त्यावेळी भू संपादन करताना प्रार्थना स्थळे सुरक्षित रहावित अशी मागणी झाली, त्यासाठी 1913 साली पुनर्वसनासाठी बनवलेल्या कायद्यातून वक्फ बोर्ड बनले. सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे सुरक्षित रहावित यासाठी ते बनवले होते, त्यात मंदिर, मशिद, गुरुद्वारा यांना विशेष अधिकार दिले होते. वक्फ सुधारणा विधेयक पास करून जमीन ताब्यात घेण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न असला तरी याच्याआडून पद्मनाभ मंदिरातील प्रचंड मोठ्या प्रमाणात असलेल्या सोन्यावर त्यांना डल्ला मारायचा आहे आणि त्यासाठीच हा सर्व खेळ सुरु आहे, असे सपकाळ म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राहुल सोलापुरकरच्या घराला पोलीस संरक्षण दिले जाते, प्रशांत कोरटकरनेही महाराजांचा अपमान केला आता त्याच्यावर कारवाईचे नाटक सुरु आहे पण या प्रवृत्तींना कोणाचे पाठबळ आहे ते सर्वांना माहित आहे. गोलवलकर यांच्या ‘बंच ऑफ थॉट’ या पुस्तकातही छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अत्यंत खालच्या स्तरावरील लिखाण केलेले आहे. आता भाजपाचा कोणी केंद्रीय मंत्री रायजगडाला भेट देणार आहे असे समजले. भाजपाला जर खऱेच छत्रपतींबद्दल अभिमान असेल तर कोरटकर, सोलापुरकरवर कठोर कारवाई करा आणि ‘बंच ऑफ थॉट’वर बंदी घाला, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
यावेळी प्रदेशाध्यक्षांसोबत खा. डॉ. शोभाताई बच्छाव, नाशिक शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आकाश छाजेड, माजी आ. शिरीष कोतवाल, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील, शरद आहेर, राजाराम पानगव्हाणे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व नाशिकचे प्रभारी ब्रीज दत्त यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.