
पहिल्या चार लढतीत तीन सामने गमावून गुणतालिकेत आठव्या स्थानावर घसरलेल्या मुंबई इंडियन्स संघ आणि मुंबईच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज आहे. मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. सोमवारी वानखेडे मैदानात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध होणाऱ्या लढतीत बुमराह खेळणार आहे. मुंबईचे कोच महेला जयवर्धने यांनी रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
जसप्रीत बुमराह याला ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीदरम्यान दुखापत झाली होती. त्याच्या पाठीला सूज झाली होती आणि यामुळे तो बॉक्सिंग डे कसोटीच्या अखेरच्या दिवशी मैदानात उतरला नव्हता. याच दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर झालेली मालिका आणि फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेली चॅम्पियन्स ट्रॉफीही त्याला खेळता आली नाही. तसेच आयपीएलच्या पहिल्या चार सामन्यांनाही तो मुकला.
गोलंदाजीची धार वाढणार
जसप्रीत बुमराह 2013 पासून मुंबई इंडियन्सच्या वेगवान गोलंदाजीचा कणा राहिला आहे. त्याने मुंबईसाठी खेळलेल्या 133 लढतीत 165 विकेट्स घेतल्या आहेत. आता तो संघात परतल्याने मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीची धार वाढणार आहे. जसप्रीत बुमराह, ट्रेन्ट बोल्ट, दीपक जहर, अश्वनी कुमार अशी वेगवान गोलंदाजांची चौकडी मुंबईकडे आहे. त्यामुळे आगामी लढतीत मुंबईचा संघ पुन्हा विजयी ट्रॅकवर येईल आणि घोडदौड सुरू करेल अशी आशा चाहत्यांना आहे.
हार्दिक पंड्या सोशल मीडियावर होतोय ट्रोल
मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने शुक्रवारी हैदराबादविरुद्धचा सामना आपल्या अष्टपैलू कामगिरीने जिंकण्याच्या दिशेने घोडदौड केली होती. मात्र, सेट झालेल्या तिलक वर्माला रिटायर्ड हर्ट करून स्वतः ही फलंदाजी करताना अखेरच्या षटकांत कच खाल्ली अन् मुंबईच्या हातातोंडाशी आलेला विजय निसटला. त्यामुळे अष्टपैलू कामगिरीत पास झालेला पंड्या संघाचे नेतृत्व करताना मात्र नापास ठरला. त्यामुळे आज दिवसभर सोशल मीडियावर मुंबई इंडियन्सचा हा कर्णधार भलता ट्रोल होताना दिसला.