
पुण्यातील वारजे परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. सोसायटीत पाणी देऊन परतत असताना चालकाच्या नजरचुकीमुळे टॅंकरच्या मागच्या चाकाखाली येऊन दोन वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. वारजे येथील गणपती माथा परिसरात शनिवारी रात्री पावणेआठच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी टँकरचालकाविरोधात वारजे पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर टँकर वारजे येथील सोसायटीत पाणी देण्यासाठी आला होता. पाणी देऊन परत जाण्यासाठी रिव्हर्स घेताना ही घटना घडली. दोन वर्षांचा बालक टँकरच्या मागच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वारजो पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत चालकाला ताब्यात घेतले.
चालक गाडी मागे घेत असताना नागरिक त्याला हातवारे करुन इशारा करत होते. मात्र चालकाने त्याकडे दुर्लक्ष करत गाडी रिव्हर्स घेतली. बालकाचा मृतदेह शवविच्छेदन करून कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.