जालन्यात संतापजनक घटना, सहा वर्षाच्या मुलीवर आईच्या प्रियकराने केला लैंगिक अत्याचार

जुना जालना भागात एका सहा वर्षाच्या मुलीवर तिच्या आईच्याच प्रियकराने लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आरोपी नराधमाला कदीम जालना पोलिसांनी अटक केली आहे.

परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एक 28 वर्षीय महिला पतीपासून विभक्त झालेली असून, ती जुना जालना भागात भाड्याच्या घरात राहते. तिला पहिल्या पतीपासून तीन मुली व एक मुलगा आहे. त्यापैकी एक मुलगा व एक मुलगी पतिकडे जिंतूर येथे राहतात. तर एक 6 व दुसरी 4 वर्षाची मुलगी त्या महिलेकडे राहत आहे. सदर महिला साफसफाई आणि घरगुती काम करून तिचा व मुलींचा उदरनिर्वाह भागवते. दोन वर्षांपूर्वी तिची एका हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करणार्‍या प्रशांत प्रकाश वाडेकर याच्याशी ओळख झाली होती. तेव्हापासून ती महिला आणि वाडेकर हे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.

सदर महिला दुपारी 3.30 वाजेपर्यंत कामानिमित्त घराबाहेर असते तर वाडेकर हा दिवसभर घरी राहून रात्री 7.30 वाजेनंतर हॉटेलमध्ये ड्युटीवर जातो. शनिवारी 5 एप्रिल रोजी दुपारी प्रशांतने सदर महिला घरी नसताना 6 वर्षीय मुलीवर आधी अनैसर्गिक कृत्य केले आणि त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या प्रकारामुळे भयभीत झालेल्या चिमुकलीला खूप ताप आला होता, मोठ्या प्रमाणात उलट्याही होत होत्या. वाडेकर ड्युटीवर गेल्यानंतर त्या मुलीने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला.

यापूर्वीही वाडेकर याने त्या मुलीसोबत असे घाणेरडे प्रकार केल्याचे तिने आईला सांगितले. यानंतर सदर महिलेने तातडीनं कदीम जालना पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने,पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव नागरे,पोलीस उपनिरीक्षक किशोर वनवे यांनी तातडीने आरोपी प्रशांत प्रकाश वाडेकर यास ताब्यात घेतले आहे. दरम्यान, सदर गुन्हा पिंक मोबाईल पथकाकडे वर्ग करण्यात आला आहे.