अहिल्यानगरला अवकाळीसह गारपिटीचा तडाखा; शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

गेल्या दोन दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्याच्या विविध भागांत अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसत आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात अनेक ठिकाणी दमदार पाऊस बरसत असून, अनेक ठिकाणी शेतातील उभ्या पिकात पाण्याचे तळे साचले आहे. तर अनेक ठिकाणी भर उन्हाळ्यात रस्त्यावरून खळखळून पाणी वाहताना दिसत आहे. जिल्ह्यात कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार 2 एप्रिलला 5 तालुक्यांतील 39 गावांतील 2 हजार 22 शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका बसला आहे. या शेतकऱ्यांच्या 892.35 हेक्टरवरील विविध पिकांचे नुकसान झाले आहे.

पाच तालुक्यांतील 22 हजार शेतकरी बाधित
अहिल्यानगर शहरासह दक्षिण जिल्ह्यातील काही तालुक्यांत गुरुवारी (दि.3) दुपारी चारपासूनच पुन्हा वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या वतीने वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत. कृषी व महसूल विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार जिल्ह्यात संगमनेर, पारनेर, कर्जत, नगर आणि अकोले तालुक्यांतील ३९ गावांतील २ हजार २२ शेतकऱ्यांना या अवकाळीचा फटका बसला आहे.

गुरुवारी दुपारी ते रात्री उशिरापर्यंत पावसाळ्याप्रमाणे अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटात आणि विजेचा लखलखाट सुरू होता. अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळ्या. नगर शहर आणि एमआयडीसी भागात पावसाच्या सरी कोसळल्या. या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

महसूल विभागाच्या माहितीनुसार संगमनेर तालुक्यात दोन गायी दगावल्या असून, एका घराची पडझड झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध झाली आहे. पारनेर, कर्जत, नगर आणि अकोले तालुक्यात अवकाळी आणि गारपिटीमुळे घरांसह पशुधनाचे नुकसान झाले असून, संबंधितांचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी होत आहे. अहिल्यानगर, संगमनेर, अकोले, पारनेर या तालुक्यांत अवकाळी पाऊस झाला आहे. या तालुक्यातील ३९ गावांतील टोमॅटो, वाटाणा, मका, कांदा, केळी, झेंडू, गहू, डाळिंब, द्राक्षे, भाजीपाला, बाजरी या पिकांचे नुकसान झाले आहे. या तीन तालुक्यांत प्राथमिक अंदाजानुसार २ हजार २२ शेतकऱ्यांच्या पिकांचे ८९२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. राहुरी तालुक्यातील वांबोरीत ७ ते ८ वाजेच्या दरम्यान वादळी पाऊस झाला. त्यामुळे गहू, कांदा व अन्य पिकांचे नुकसान झाले.

पाथर्डीत फळबागांचे नुकसान
तालुक्यात अवकाळी पाऊस आणि वाऱ्याच्या तडाख्याने पिकांचे मोठे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तालुक्यातील पूर्व भागात टाकळी मानूर, पिंपळगाव टप्पा, चिंचपूर इजदे, कुत्तरवाडी, करोडी, मोहटे या भागांत अवकाळी पावसासोबतच वाऱ्याने शेतकऱ्यांची उन्हाळी बाजरी, काढणीला आलेला कांदा, आंबा व फळबागांचे नुकसान झाले आहे.

पारनेर तालुक्यात कांदा पिकाचे नुकसान
पारनेर तालुक्यात बुधवारी आणि गुरुवारी सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांदा पिकाची काढणी सुरू होती. शेतात उघड्यावर असणाऱ्या कांदा पिकाला अवकाळीसह गारपिटीचा फटका बसला आहे. याबरोबरच कांदा, गहू, वाटाणा, टोमॅटो पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे गुरुवारपासून पंचनामे सुरू केल्याची माहिती कृषी अधिकारी गजानन घुले यांनी दिली.

या पिकांना बसला फटका
अहिल्यानगर जिल्ह्यात दोन दिवसांपासून बरसणाऱ्या अवकाळी पावसामुळे आंबा, टोमॅटो, वाटाणा, मका, कांदा, केळी बाग, झेंडूची फुले, काढणीस आलेला गहू, डाळिंब, द्राक्ष बागा, भाजीपाला पिके, उन्हाळी बाजरी, चारा पिके आणि पेरूच्या बागांना फटका बसला आहे.

सांगलीत वळीवाची जोरदार हजेरी
ढगांचा गडगडाट अन् मेघगर्जनेसह गुरुवारी सायंकाळी जिल्ह्यातील काही भागांत वळीव पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला, तर मका व ऊसपिके भुईसपाट झाली. वाळवा तालुक्यात गुरुवारी चिकुर्डे, ऐतवडे बुद्रुक, ढगेवाडी, कार्वे, डोगरवाडी, शेखरवाडी, शिवपुरी, जक्राईवाडी, लाडेगाव व करंजवडे येथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. रस्त्यावर झाडे तुटून पडल्यामुळे ईश्वरपूर ते चिकुर्डे व शिराळा ते आष्टा रस्त्यावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली. तर, चिकुर्डे व डोंगरवाडी येथे यात्रेतील व्यापाऱ्यांचे पावसामुळे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी मका व ऊसपिके भुईसपाट झाली.

दुपारी तीननंतर तब्बल दोन तास पाऊस सुरू होता. वादळी वाऱ्यामुळे चिकुर्डे ते ईश्वरपूर मार्गावरील लाडेगाव व शिराळा ते आष्टा मार्गावरील ऐतवडे बुद्रुक येथे अनेक झाडे रस्त्यावर तुटून पडल्यामुळे वाहतूक बराच वेळ ठप्प झाली होती. अनेक ठिकाणी विजेच्या खांबांवर झाडे पडल्यामुळे तारा तुटून परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. या परिसरात मातीच्या वीटभट्टी असल्याने वीटभट्टीचालकांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, दमदार पावसामुळे काही ठिकणी सुकू लागलेल्या पिकांना जीवदान मिळाले. मागील दोन-चार दिवसांत वातावरणातील बदलामुळे उष्मा वाढला होता. परिणामी गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजल्यापासून जोरदार वाऱ्यासह गारपिटीचा मुसळधार पाऊस झाला. लेंगरे येथे यात्रेनिमित्त आलेल्या सर्व व्यावसायिकांचे पावसामुळे हाल झाले.