
आपत्ती निवारणासाठी अग्निशमन दलाला 24 तास अलर्ट राहावे लागते. यासाठी जवानांना फिट राहावे लागते. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलाने नुकतीच जवानांच्या फिटनेसची मॉक ड्रिल घेतली. यामध्ये १० किलोचा होज पाइप खांद्यावर घेऊन अग्निशमन जवानांनी एक मिनिटात आठ मजले सर केले. फिटनेसच्या कसोटीत जवान १०० टक्के यशस्वी ठरले. दिल्लीनंतर अशी पहिलीच ‘फिटनेस मॉक ड्रिल’ कल्याणमध्ये घेण्यात आली.
कल्याण पश्चिमेतील शहाड येथील बिर्ला वन्य या बहुमजली इमारतीत मॉक ड्रिल घेण्यात आले. यामध्ये अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांना वजनदार पाण्याचा पाइप (होज) खांद्यावर घेऊन आठव्या मजल्यापर्यंत पळत चढून पोहोचायचे होते. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये किती वेळ लागतो याचे निरीक्षण केले गेले. दहा किलोचा होज पाइप आणि अन्य साहित्य घेऊन जवानांनी अवघ्या एक मिनीट 10 सेकंदांत आठ मजले गाठले. विशेष बाब म्हणजे, सर्वच कर्मचाऱ्यांनी अतिशय कमी वेळेत उद्दिष्ट पूर्ण करत आपल्या फिटनेसची आणि तत्परतेची सिद्धता दिली.
है तैयार हम…
महानगर परिसरात गेल्या काही महिन्यांत उंच इमारतींमध्ये आगी लागण्याच्या घटना वाढल्याने, अशा संकुलांमध्ये तत्काळ पोहोचणे आणि बचावकार्य करणे हे अग्निशमन दलासमोरील मोठे आव्हान बनले आहे. या पाश्र्वभूमीवर हे मॉक ड्रिल अत्यंत उपयुक्त ठरल्याची माहिती केडीएमसीचे मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली. कर्मचाऱ्यांची शारीरिक क्षमता तपासणे आणि प्रत्यक्ष आपत्तीच्या वेळी तत्परता वाढवणे हा मॉक ड्रिलचा उद्देश यशस्वी झाल्याचेही त्यांनी सांगितले.