आजारी लेकीच्या इंजेक्शनसाठी जमीन विकून गाठले चीन, हातकणंगलेतील हतबल बाबाची कहाणी

>> शीतल धनवडे

लक्ष्मीच्या पावलाने आलेल्या; पण बागडण्याच्या कोवळ्या वयातच अंथरुणाला खिळलेल्या आपल्या एकुलत्या एक अवघ्या सात वर्षांच्या ओवीला वाचविण्यासाठी हातकणंगले तालुक्यातील सागर पुजारी या बापाची चाललेली धडपड मन हेलावणारी आहे. गोवर विषाणूतील जंतूंमुळे लहान मुलांच्या जीवावर बेतणाऱ्या एसएसपीई या दुर्मिळ आजाराने ग्रस्त लेकीच्या उपचारासाठी विम्याची तरतूद नाही. शासनाच्या वैद्यकीय योजनेतही समावेश नसल्याने या बापाने जमीन विकून, कर्ज काढले. इंजेक्शनसाठी मित्राला घेऊन चीन गाठले. परिस्थितीने दबलेल्या या बापाला आता मानसिक आधारासह गरज आहे ती दानशूरांची आणि या दुर्मिळ आजारावर लस निर्माण करण्यासाठी सरकारच्या तत्परतेची…

हातकणंगले तालुक्यातील व्यवसायाने मेंढपाळ असलेले सागर शामराव पुजारी हे तीन भावांसह एकत्र कुटुंब पद्धतीने राहतात. त्यांचा छोटासा हॉटेल व्यवसाय आहे. घरी पत्नीसह चौथीत असलेला मोठा मुलगा आणि मुलगी ओवी असा सुखाचा संसार सुरू असतानाच, गेल्या वर्षी 9 नोव्हेंबरपासून ओवीला अचानक झटके येऊ लागले. वैद्यकीय तपासणीत हा आजार समोर आला. पण यावर औषधोपचार उपलब्ध नसल्याचे ऐकून कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच घसरली.

हसत खेळत बागडणारी ओवी गेल्या तीन महिन्यांपासून एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी निपचित पडून आहे. कसलीही शारीरिक हालचाल नाही की कसलाच प्रतिसाद नाही. उपचारासाठी कसली लस नाही की विमा नाही. शासकीय योजनेतही समावेश नाही. तरीसुद्धा ओवीला या जीवघेण्या आजारातून बाहेर काढण्यासाठी ठेवी मोहल्या, दोन गुंठे जमीन विकली, पतसंस्थेतून कर्ज घेतले, नातेवाईकांकडून हातउसने घेत धडपड सुरूच ठेवली.

इंग्रजी भाषेची अडचण असतानाही केवळ मुलीचा जीव वाचवण्यासाठी एका मित्राला घेऊन चीन गाठले. तेथील एका रुग्णालयात अत्यंत गयावया करून, पाहिजे असलेली लस उपलब्ध केली. तीन लाख रुपये भारतीय मूल्य असलेल्या या 30 डोसची त्यांनी तूर्त व्यवस्था केली असली, तरी अजूनही त्यांना तेवढ्याच डोसची गरज आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस हा डोस सुरू केल्यानंतर सध्या 10 टक्के फरक पडल्याचे दिसून येत आहे. ओवी आता हाक मारल्यावर डोळे उघडून प्रतिसाद देऊ लागली आहे. पाणी गिळत आहे. तिच्या संवेदना हळूहळू आगृत होत असल्याचे सागर पुजारी यांनी सांगितले.

लाखांत एक दोघांना असलेला व मेंदूची झीज करणारा आजार

एसएसपीई (सबएक्यूट स्क्लेरोसिंग पैनेंसेफलाइटिस) हा दुर्मिळ आजार गोवरच्या जंतूमुळे होतो. मेंदूपर्यंत शिरकाव होऊन मेंदूची झीज होण्यास सुरुवात होते. सर्वच मुलांना नाही पण लाखातील एक दोन मुलांना हा आजार होतो. यावर अजून तरी आपल्या देशात औषधोपचार दिसून येत नाही. आपल्या वीस वर्षाच्या वैद्यकीय सेवेत वर्षातून किमान एक-दोन असे रुग्ण आपल्याकडे उपचारासाठी येतात. आजपर्यंत आपल्याकडे आलेल्या अशा 14 ते 15 मधील तीन ते चार जणच नैसर्गिक उपचाराने बरे झाले असल्याचे ओवीवर वैद्यकीय उपचार करणारे डॉ. विलास जाधव यांनी सांगितले.