सृजन संवाद – राम जन्मला गं सखे…

>> डॉ. समिरा गुजर जोशी

राम नवमीचा आनंद आपण सारे साजरा करत आहोत. राम जन्माचा हा उत्सव साजरा करत असताना वाल्मीकी रामायणात त्यामागे दडलेल्या कारणाविषयी जे सांगितले आहे त्याकडेही एक नजर टाकू.

दशरथ राजाने पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करण्याचे ठरवले. त्यासाठी ऋषुशृंग मुनींना पाचारण करण्यात आले हे आपण जाणतोच. हा यज्ञ करण्यासाठी एक संपूर्ण नगर किंवा यज्ञ-वाटिका उभी करण्यात आली होती. ज्यात देशोदेशीचे राजे, विद्वान, ऋषि-महर्षि येऊन राहिले होते. त्यांच्यासाठीची व्यवस्था पाहता आजच्या काळातील ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ खरे तर तेव्हापासून आहे असेच म्हणावेसे वाटते. त्याविषयी आपण स्वतंत्रपणे समजून घेऊया. पण याच भव्य संमेलनात आणखी एक अदृश्य संमेलन सुरू होते. हे संमेलन अदृश्य होते, कारण ते देवांचे संमेलन होते. त्यांच्यासमोर उभ्या एका गंभीर प्रश्नाची चर्चा करण्यासाठी ते जमले होते. ही समस्या म्हणजे रावणाचा वध करणे. सहसा रावणाला शिवाने वर दिल्याचे आपण ऐकत आलो आहोत. पण रामायणात बालकांडामध्ये ब्रह्मदेवाने रावणाला अमर होण्याचा वर दिला असे सांगितले आहे. याच संदर्भात सगळे देव चिंता व्यक्त करत आहेत की, या वरामुळे रावण उन्मत्त झाला आहे. ब्रह्मदेवही तेवढेच चिंतित आहेत. ते म्हणतात की, “मी त्याला आधीच सांगितले होते की कोणीही अमर होऊ शकत नाही. तरीही त्याने आग्रह धरला तेव्हा मी त्याला गंधर्व, यक्ष, राक्षस आणि देव यांना तो अवध्य असेल असे वचन दिले. असे मी करायला नको होते हे खरे. पण यावर एक उपाय मला दिसतो आहे. रावण अहंकारी असल्यामुळे क्षुद्र मानव आपले काही बिघडवू शकेल असे त्याला वाटले नाही. या वरामध्ये तो मानवाकडून अवध्य आहे असे म्हटलेले नाही. तेव्हा मानवाला त्याचा वध करता येईल.” मग भगवान विष्णु ही जबाबदारी स्वीकारतात. दशरथ राजाचे चार पुत्र हे विष्णुचेच अंश असतील असे ठरते. इतकेच नव्हे तर विष्णुच्या ह्या मानवरूपाला सहकार्य करतील असे वानर सैन्यसुद्धा जन्मास घालण्याचे ठरते. म्हणजे एक अख्खी जनरेशन या निमित्ताने तयार होते असे म्हणूया.

वाल्मीकी रामायणात सांगितलेली ही गोष्ट पुढे जनमानसात कसे रूप घेते ते पाहू. तर गंमत ही की, रावणाला मिळालेल्या वरामध्ये मानवाचा समावेश नाही असा उल्लेख आहे. पण लोक परंपरेमध्ये नर आणि वानर या दोघांना रावणाने वगळले, असे म्हटले आहे. नर आणि वानर एकत्र ऐकायलाही छान वाटते आणि कथेला धरूनही आहे. असा हा थोडासा बदल झालेला दिसला तरी गोष्टीचे तात्पर्य आजही लक्षात घेण्यासारखे आहे. शत्रूला underestimate करू नये. म्हणजेच गौण लेखू नये. नर किंवा वानर यांना दुबळे समजण्याची चूक झाली आणि तीच रावणाच्या नाशाचे कारण ठरली.

एकनाथ महाराजांनी ही कथा थेट न सांगता एका वेगळ्या प्रकारे तिचा समावेश केला आहे. त्यांच्या भावार्थ रामायणात दशरथ कौसल्या राणीला डोहाळे विचारतो आहे. तेव्हा कौसल्या राणी जणू भ्रमात असल्याप्रमाणे काही बडबडते. ती म्हणते,

म्हणे मी अवघा राम। मज माजी तव कैचा भ्रम?
अवतरलो पुरुषोत्तम। देवांचे श्रम फेडावया।।
मी नव्हे स्त्राr ना पुरुष। नर वानर वा राक्षस।।
ईशाचा जो निज ईश। परम पुरुष श्रीराम ।।

दशरथ गोंधळून जातो की ही असे का बोलते आहे? तो तिला विचारतो की, का असे बोलते आहेस? आपल्या लग्नाच्या वेळी तो उन्मत्त राक्षस रावण त्याने त्रास दिला होता, त्याची आठवण तुला होते आहे का?

रावण हे नाव ऐकताच कौसल्या राणी चवताळून उठते… म्हणू लागते, दे दे धनुष्य बाण. करू लंकेचे निर्वाण… तिचा रुद्रावतार पाहून दशरथ राजा गोंधळून जातो. पण आता जणू कौसल्या राणी नव्हे तर तिच्या पोटातील श्रीराम पुढील भविष्यवाणी करत आहेत.

एकनाथांनी हा प्रसंग सुंदर रंगवला आहे. मूळ वाल्मीकी रामायणात देवांच्या सभेत जी रावणवधाची योजना निश्चित करण्यात आली तीच इथे डोहाळ्याच्या रूपाने सांगण्यात आली.

`गर्भाचे आवडी मातेचा डोहळा।’ असे तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. जिजाऊ मांसाहेबांनासुद्धा युद्ध करण्याचे, घोडय़ावर स्वार होण्याचे डोहाळे लागले होते म्हणतात. पुढे सीतेला वनात जायचे डोहाळे लागले होते ना!

रामजन्म ही भारतीय मनाला प्रेरणा देणारी घटना आहे. तिची नित्यनवी रूपे प्रतिभावंतांना खुणावत असतात. म्हणून आज ही कौसल्या मातेच्या डोहाळ्यांची गोष्ट सांगाविशी वाटली. सज्जनांचा विश्राम असणारे प्रभू श्रीराम असेच आपल्याला प्रेरणा देत राहोत.

[email protected]
(निवेदिका, अभिनेत्री आणि संस्कृत – मराठी वाङमयाची अभ्यासक)