
>>रविप्रकाश कुलकर्णी
मराठीमध्ये कोशाची उज्ज्वल परंपरा श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी सुरू केली आणि त्यानंतर मराठीमध्ये नवनवे कोश येतच राहिले. हे प्रमाण इतके आहे की, भारतीय भाषेत सर्वात जास्त कोश मराठीत आहेत. या परंपरेत बसेल असा आता फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश (प्रारंभापासून 2022 पर्यंतचा कालखंड) संपादक डॉ. महेंद्र मारोतराव भवरे यांनी केलेला आहे. कोश वाङ्मय प्रकाशित करण्यात ज्यांची ख्याती आहे अशा डायमंड पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित झालेला आहे.
संपादक महेंद्र भवरे म्हणतात, 1956 नंतर उदयास आलेल्या दलित वाङ्मयाने सहा दशकांपेक्षा अधिक कालखंड पूर्ण केला आहे. मात्र या वाङ्मयाची बीजे 19व्या शतकात पहावयास मिळतात. महात्मा फुले यांची चळवळ, त्यांचे सामाजिक कार्य आणि त्यांनी निर्माण केलेले वाङ्मय हा दलित, शोषित, पीडितांच्या वतीने पुकारला गेलेला पहिला विद्रोही स्वर होता. विसाव्या शतकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानवमुक्तीचे आंदोलन, त्यांची वृत्तपत्रे, त्या वृत्तपत्रांतून प्रकाशित झालेले वाङ्मय, आंबेडकरी जलसे, आंबेडकरी लोकगीते आणि 1956 नंतर उदयाला आलेलं साहित्य, या वाङ्मयाचा विकास ही या देशातील ऐतिहासिक लक्षवेधी सांस्कृतिक घटना आहे. हा इतिहास विद्यार्थी, संशोधक, अभ्यासक, वाचक यांना अवगत व्हावा यासाठी काळाच्या गरजेतून फुले-आंबेडकरी वाङ्मय कोश निर्माण केला आहे. या कोशात केवळ लेखक, कवी आदींच्या नोंदी नाहीत, तर त्यांच्या विषयीच्या माहितीबरोबरच त्यांच्या साहित्यकृतीचे परिशीलन आणि त्याचे वेगळेपण याचेही विवेचन केलेले आहे. त्यामुळे केवळ वाङ्मयीन संदर्भापुरती त्याची उपयुक्तता नाही, तर त्या अनुषंगाने सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतला एक महत्त्वपूर्ण साधन म्हणून या कोशाचे महत्त्व अधिक ठरते. या कोशात सर्वसाधारणपणे आपल्याला माहीत असलेल्या गोष्टी आहेतच, पण अपरिचित आणि कित्येकदा चक्रावून टाकणाऱया हकिकती/माहिती सापडते. उदाहरणार्थ, ‘भग्न शिल्पांच्या आत्मकथा’ हे वसंत मून अनुवादित पुस्तक आहे. मूळ पुस्तक हिंदी आहे. त्याबाबत कोशात नोंद आहे.
या पुस्तकाचे मूळ लेखक व कथनकार महापंडित राहुल सांकृत्यायन आहेत की आचार्य चतुरसेन हे निश्चितपणे सांगता येत नसले तरी या पुस्तकातील रेखाटन हे एखाद्या महान कवीच्या व इतिहास अभ्यासकाच्या लेखणीतून उतरलेले आहे याची साक्ष या पुस्तकांमधून पदोपदी पटते. महाराष्ट्रातील कानाकोपऱयात असलेल्या लेखकांचा शोध घेणे, त्यांची यथासांग माहिती जमवणे हे काम सोपे नाहीच. सहनशीलतेची पराकाष्ठा करायला लागली असणार. काम जिकिरीचे आणि किचकट हे खरेच. संपादक महेंद्र भवरे यांनीच म्हटले आहे, “काही वेळा अपमानही सहन करावा लागला. मनस्ताप व्हायचा.’’ त्याबाबत त्यांनीच नमूद केले आहे की, लेखकाकडे छायाचित्र मागितल्यानंतर त्या लेखकाने फोन करून विचारले, “सर, छायाचित्र म्हणजे काय?’’ आता रे काय करावे!
तरीदेखील भवरे म्हणतात, “अशी करमणूकही होत होती. या सर्व गोष्टी एन्जॉय करण्याचे या प्रकल्पाने शिकवले.’’ त्यानंतर ते म्हणतात, “चांगल्या कामाच्या प्रवासात अनेकांचे वैविध्यपूर्ण अहंकार नावाचे अनेक गतिरोधक लागतात एवढे मात्र चांगलेच अनुभवता आले.’’ एकूण काय, लेखकाचा लेखकराव व्हायला वेळ लागत नाही हेच खरे. सूर्यनारायण रणसुभे यांनी या कोशाबाबत नेमके निरीक्षण नोंदवले आहे. ते म्हणतात, फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश हे तसे पाहता तथाकथित मुख्य धारेकडून उपेक्षित झालेले वाङ्मय. पुढे त्यांनी म्हटले आहे, “हा फक्त आंबेडकरी साहित्याचा वाङ्मयकोश आहे. त्याची सुरुवात जर फुलेंपासून झालेली आहे असे संपादकांचे म्हणणे असेल तर फुले विचाराला प्रमाण मानून लिहिले गेलेले सत्यशोधकी लेखक यात का नसावेत? असा प्रश्न निर्माण होतो. पण त्याच वेळी ते डॉ. श्रीराम गुंदेकर लिखित सत्यशोधकी वाङ्मय इतिहासाच्या अपूर्ण राहिलेल्या प्रकल्पाकडे लक्ष वेधतात आणि जणू सुचवतात याकडे जाणत्यांनी लक्ष दिले पाहिजे.
अशा तऱहेने सदर कोशात साडेपाचशेपेक्षा अधिक छोटय़ा मोठय़ा लेखकांविषयीच्या नोंदी समाविष्ट आहेत. त्यांची कोशाच्या शेवटी व्यक्तिनाम सूची आहे. कोणताही कोश कधीही परिपूर्ण असा होत नसतो. काहीतरी न्यून राहतेच. अशा गोष्टी या कोशात पण दिसतात. उदाहरणार्थ, काही लेखकांच्या नावापुढे लिहिलेले दिसते – फोटो उपलब्ध नाही. मात्र प्रत्यक्षात तेथे फोटो आहे. मग हा फोटो कोणाचा असा प्रश्न पडतो?
सरतेशेवटी एक महत्त्वाची सूचना, अगदी सगळ्या कोशकारांना ती लागू पडावी. अनेक नोंदींच्या वेळी काही माहिती मिळत नाही. उदाहरणार्थ, जन्ममृत्यूच्या तारखा. कोशाच्या शेवटी परिशिष्टामध्ये या गोष्टींची माहिती हवी आहे अशी नोंद करायला हवी, जेणेकरून ते वाचून, ती माहिती असलेली माणसे संपादकाला कळवतील. उदाहरणार्थ, म.ना.वानखडे यांची जन्मतारीख मिळू शकेल. अर्थात कोश अधिक संदर्भ उपयुक्त ठरावा म्हणून या सूचना आहेत. बाकी एक विशेष कोश म्हणून या कोशाची उपयुक्तता कायम राहील.