अर्थखात्याने फक्त आर्थिक बाबीच तपासाव्यात, फायली अडकवू नयेत; देवाभाऊंची अजितदादांच्या खात्याला तंबी

महायुती सरकारने 100 दिवसांचा कृती आराखडा बनवून कार्यवाही सुरू केली. परंतु मुदत पूर्ण होत आल्यानंतरही बरीच कामे रखडून पडली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या कृती आराखडय़ाच्या कार्यवाहीचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली. उच्चस्तरीय समितीने एकदा निर्णय घेतल्यानंतर फाईल अर्थखात्यामध्येच अडकून पडणे चुकीचे असून अर्थखात्याने फक्त आर्थिक बाबीच तपासाव्यात, फायली अडकून ठेवू नयेत, अशी तंबीच यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अजित पवार यांच्या अर्थ खात्याला दिली.

ऊर्जा, क्रीडा, महिला व बालविकास, शिक्षण, आरोग्य, उत्पादन शुल्क, परिवहन, वैद्यकीय शिक्षण, ग्रामविकास आदी 22 विभागांच्या 100 दिवस कार्यक्रमाच्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज मंत्रालयाऐवजी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक आयोजित केली होती. या विभागांनी 100 दिवसांच्या कृती आराखडय़ासाठी ठरवलेल्या कामांपैकी 44 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. इतर कामांपैकी काही अंतिम टप्प्यात असून काही अद्याप रखडलेलीच आहेत. त्यामागची कारणे यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतली. अर्थखात्यामध्ये फाईल्स अडकून पडणे हे त्यातील एक प्रमुख कारण होते. उच्चस्तरीय समितीने हिरवा पंदील दिल्यानंतरही फाईल्स अडकून पडल्याचे समजताच मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची शाळा घेतली. अर्थखात्याने फक्त अर्थविषयक बाबींबाबतच निर्णय घेऊन फाईल पुढे पाठवावी, धोरणात्मक बाबींवर टिप्पणी करत बसू नये, असे निर्देश त्यांनी दिले. या बैठकीला उपमुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव सौनिक यांच्यासह संबंधित विभागाचे मंत्री, राज्यमंत्री, अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव आदी उपस्थित होते.