
प्रचंड विरोधानंतरही बहुमताच्या जोरावर केंद्रातील भाजप सरकारने संसदेत वक्फ सुधारणा विधेयक मंजूर करून घेतल्याने मुस्लिम समाज आक्रमक झाला असून गुजरात, बिहारसह आठ राज्यांत भडका उडाला आहे. जुम्म्याच्या नमाजानंतर आज आंदोलनाची ठिणगी पडली. ‘तानाशाही नहीं चलेगी…वक्फ बिल मागे घ्या,’ अशा घोषणा देत संतप्त जमावाने उग्र निदर्शने केली. गुजरातमध्ये हातावर काळी पट्टी बांधून आंदोलन करण्यात आले. दरम्यान, आंदोलनाचा वणवा सर्वत्र पसरत असल्याने पुढे काय होणार अशी चिंता पसरली असून अवघ्या देशात तणाव आणि भीतीचे वातावरण आहे.
वक्फ विधेयकाविरोधात बुधवारपासूनच आंदोलन सुरू झाले आहे. आज पश्चिम बंगाल, गुजरात, बिहार, झारखंड, तामीळनाडू, तेलंगणा, कर्नाटक आणि आसाम या राज्यांत मुस्लिमांनी रस्त्यावर उतरत निदर्शने केली. गुजरातमधील अहमदाबादमध्ये दुपारी मोठा जमाव रस्त्यावर उतरला होता. पोस्टर्स जाळून मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी बळाचा वापर करत पोलिसांनी आंदोलन थांबवले. पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. कोलकात्यातील पार्क सर्कस क्रॉसिंग येथे हजारोंच्या जमावाने निदर्शने केली. रांची, पाटण्यातही उग्र निदर्शने झाली. तामीळनाडूत अभिनेता विजयच्या तमिलगा वेत्री कझगमच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. मोदी सरकारविरोधात घोषणा देत संताप व्यक्त करण्यात आला.
उत्तर प्रदेशात हाय अलर्ट
उत्तर प्रदेशातील सर्व 75 जिह्यांमध्ये पोलिसांसाठी हाय अलर्ट देण्यात आला आहे. अनेक संवेदनशील भागांत फ्लॅग मार्च काढण्यात आला तर दर्गा व मशिदींवर ड्रोनद्वारे वॉच ठेवला जात आहे.
महाराष्ट्र सावध; सुरक्षेत वाढ
महाराष्ट्रात पोलिसांना सतर्क करण्यात आले आहे. मुंबईसह राज्यभरात बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. संवेदनशील भागांवर पोलिसांची करडी नजर आहे. सुरक्षेचा आढावा घेण्यात येत आहे.
विधेयकाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान
एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी आणि काँग्रेसचे खासदार मोहम्मद जावेद यांनी दोन वेगवेगळ्या याचिका दाखल करत वक्फ विधेयकाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. वक्फ सुधारणा विधेयक मुस्लिम समाजाच्या अधिकारावर गदा आणणारे आणि भेदभावपूर्ण आहे, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.