
राज्यात कोकण, विदर्भासह मराठवाड्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे अवकाळीने अवघ्या महाराष्ट्राचे टेन्शन वाढवले आहे. आज मुंबईत धुळीचे वादळ तर ठाणे जिह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. दरम्यान, राज्याच्या विविध भागांत पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता तर मुंबईसह उपनगरात तसेच ठाणे, रायगड आणि पालघर जिह्यात वादळी वारे वाहतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह वादळे आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच ताशी 30 ते 40 कि.मी. वेगाने वारे वाहतील, असा अंदाज आहे.
कल्याण, डोंबिवलीला तडाखा
कल्याण आणि डोंबिवलीत वादळी वाऱ्याचा चांगलाच तडाखा बसला. त्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे नुकसान झाले आणि फलक कोसळण्याच्या घटना घडल्या. याचा वाहतुकीवर परिणाम झाला. कल्याणमध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झाल्यामुळे खरेदीसाठी, कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. अंबरनाथलाही अवकाळी पावसाने झोडपले.
शहापूर आणि भिवंडी तालुक्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. शहापूर तालुक्यात काही भागांत गारपीटही झाली. कडक उन्हाने हैराण झालेल्या नागरिकांना थोडा दिलासा मिळाला. भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात झाडे कोसळण्याच्या आणि पत्रे उडून जाण्याच्या घटनाही घडल्या. यात कुठलीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
माथेरान आणि मोखाड्यात गारपीट
थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये आज मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली. पालघर जिह्यातील मोखाडावासीयांनाही गारपिटीने झोडपले. गारपिटीमुळे माथेरानमधील पर्यटकांची चांगलीच दैना उडाली. मोखाडा तालुक्यात गारपिटीमुळे आंबा, काजूचे नुकसान झाले. तर खोडाळा-विहीगाव रस्त्यावर महाकाय झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. अनेक भागांत वीजपुरवठाही खंडित झाला. त्यामुळे ग्रामस्थांचे हाल झाले.
मध्य रेल्वे विस्कळीत नाशिक महामार्ग ठप्प
वादळी वाऱ्यामुळे आटगाव आणि धानशेत रेल्वे स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये पत्रा अडकल्याची घटना घडली. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे बाहेरून पत्रा उडून ओव्हरहेड वायरवर येऊन पडला. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. कसाऱ्याहून कल्याणच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला. लोकल वाहतूक 15 ते 20 मिनिटे विस्कळीत झाली. तर मुंबई-नाशिक महामार्गावरील खर्डी-आटगाव दरम्यान दोन्ही लेनवर महावितरणच्या वायर रस्त्यावर पडल्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक 30 मिनिटे ठप्प झाली. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.