आता दिल्लीची चेन्नईवर स्वारी, विजयाच्या हॅटट्रिकचे ध्येय दिल्लीपुढे

आधी लखनौ, मग हैदराबाद आणि आता चेन्नईवर स्वारी करण्यासाठी दिल्ली सज्ज झाला आहे. चेन्नईला गेल्या दोन सामन्यांत हार सहन करावी लागली आहे, तर दुसरीकडे सलग दोन विजय मिळवून आघाडीवर असलेला दिल्ली आता विजयाच्या हॅटट्रिकसाठी उत्सुक आहे. सध्या दिल्लीची गोलंदाजी, फलंदाजीमध्ये तुफानी कामगिरी सुरू असल्याने उद्याच्या सामन्यात चेन्नईपुढे दिल्लीचे तगडे आव्हान असणार आहे, मात्र चेन्नईला त्यांच्या घरच्या मैदानात पराभवाचे पाणी पाजणे दिल्लीसाठी म्हणावे तितके सोपे असणार नाही. त्यामुळे उद्या खऱया अर्थाने क्रिकेटचे द्वंद्व अनुभवायला मिळणार आहे.

शनिवारी दोन सामने खेळवले जाणार आहेत. पहिला सामना हा चेन्नई आणि दिल्ली यांच्यात खेळवला जाणार आहे, तर दुसऱया सामन्यात पंजाब आणि राजस्थान यांच्यात मैदानातली लढाई रंगणार आहे.

दुपारी चेन्नई आणि दिल्ली यांच्या होणाऱया सामन्यात दिल्लीचे पारडे जड राहील, अशी शक्यता क्रिकेटतज्ञांनी वर्तवली आहे. सध्या दिल्लीचा संघ तुफान फॉर्मात आहे. पहिल्या दोन्ही सामन्यांत विजय मिळवून दिल्ली गुणतालिकेत दुसऱया स्थानी विराजमान आहे, तर दुसरीकडे तीन सामन्यांत दोन पराभवांसह चेन्नई आठव्या स्थानी आहे. चेन्नईच्या फलंदाजीमध्ये रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे या तगडय़ा फलंदाजांचे आव्हान दिल्लीच्या गोलंदाजीपुढे असणार आहे, मात्र गेल्या सामन्यात पाच विकेट घेणाऱया मिचेल स्टार्कच्या पुढे चेन्नईचे फलंदाजी किती तग धरतात हे पाहण्याजोगे असणार आहे. दिल्लीच्या फलंदाजीमध्ये फाफ डुप्लेसिस सध्या चांगल्या फॉर्मात असून त्याला अभिषेक पोरेल, स्टब्स, आशुतोष शर्मा याची उत्तम साथ लाभत आहे. त्यामुळे दिल्लीच्या फलंदाजांना रोखण्याचे तगडे आव्हान चेन्नईच्या गोलंदाजांना पेलावे लागणार आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजी यांच्यातील युद्ध अनुभवता येणार आहे.

पंजाब फॉर्मात; राजस्थान चाचपडतोय

शनिवारी सायंकाळी होणाऱया दुसऱया सामन्यात पंजाब आणि राजस्थान हे भिडणार आहेत. कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पहिल्या दोन्ही सामन्यांत विजय मिळाल्याने पंजाबचे मनाधैर्य उंचावलेले आहे, तर दुसरीकडे पहिले दोन्ही सामने गमावल्यानंतर तिसऱया सामन्यात विजय मिळवून राजस्थानने विजयाचे खाते उघडले आहे. राजस्थानच्या गोलंदाजांना म्हणावा तसे यश मिळवता आलेले नाही. त्यामुळे तुफान फॉर्मात असणाऱ्या पंजाबच्या फलंदाजांना रोखण्यासाठी राजस्थानच्या गोलंदाजांना अधिक मेहनत करावी लागणार आहे. श्रेयस तुफान फॉर्मात असून उद्याच्या सामन्यात त्याच्या फलंदाजीकडे विशेष लक्ष असणार आहे, तर जैसवालची बॅट तळपणार का याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.