
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल हे देशाचा शत्रू असलेल्या दाऊद इब्राहिमचे दलाल आहेत, त्यांनी शिवसेनेच्या नादाला लागू नये, नागडा करू, असा थेट इशारा शिवसेना नेते- खासदार संजय राऊत यांनी आज दिला. प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे लोक कोणाचेही नाहीत, ते दलाल आहेत, दाऊदची दलाली करून नंतर भाजपमध्ये जाऊन त्यांनी ईडीने जप्त केलेली हजारो कोटींची संपत्ती मोकळी करून घेतली, त्यांची संसदेत बोलण्याची लायकी नाही, ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.
संसदेत वक्फ विधेयकावर बोलताना पटेल यांनी शिवसेनेवर रंग बदलल्याचा आरोप केला होता. त्याचा खरपूस समाचार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला. ते म्हणाले की, प्रफुल्ल पटेल यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाऊदचा हस्तक असल्याचा आरोप केला होता. कुख्यात इक्बाल मिर्चीबरोबर त्यांचे संबंध होते. त्यांच्याबरोबर व्यवहार केल्याने पटेल यांच्यावर ईडीची कारवाई झाली. त्यांच्या मालमत्ता जप्त झाल्या. असा आरोप अलीकडच्या काळात कोणत्याही राजकारण्यावर झाला नव्हता, असे संजय राऊत म्हणाले. पाकिस्तानात आश्रयाला असलेला देशाचा सर्वात मोठा दुश्मन दाऊद इब्राहिम याच्याबरोबर प्रफुल्ल पटेल यांचे संबंध आहेत, असल्याची पोलखोलही त्यांनी केली.
पटेल संसदेत आहेत हे लाजिरवाणे
दाऊदचा हस्तक असलेले प्रफुल्ल पटेल संसदेत आहेत हे लाजिरवाणे आहे. दाऊदच्या हस्तकाला भाजपने आपल्या पक्षात घेतले आणि हे दुसऱ्यांना निष्ठsच्या, रंग बदलण्याच्या गोष्टी सांगतात, अशी चपराकही संजय राऊत यांनी लगावली. प्रफुल्ल पटेलसारख्या माणसाला सोबत घेऊन अजित पवार यांनी स्वतःचे अवमूल्यन करून घेतले आहे, असे संजय राऊत कडाडले.
तर पटेलांना महाराष्ट्र सोडून जावे लागेल
शिवसेनेने कधीच रंग बदलले नाहीत. आम्ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आहोत. पटेलांचा नक्की कोणता रंग आहे ते पहा, त्यांना दाऊद इब्राहिमचा हिरवा रंग लागला आहे आणि ते वक्फवर बोलताहेत, असा सणसणीत टोलाही संजय राऊत यांनी लगावला. ते पुढे म्हणाले की, वक्फ विधेयकावर बोलताना प्रफुल्ल पटेल भाजपच्या लोकांना संसदेत चमचेगिरी करून दाखवत होते.
रंग बदलण्याच्या गोष्टी शिवसेनेशी करू नका, महागात पडेल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही राऊत यांनी यावेळी निशाणा साधला. प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या लोकांना सोबत घेणे हीच लेव्हल आहे का फडणवीसांची, असा खोचक सवाल त्यांनी केला. संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, पटेल यांच्यासारखी लोपं मोदी, अमित शहांसमोर कायम वाकलेली असतात, असे ते म्हणाले.