लखनौचा आवेशपूर्ण विजय, आवेश-खानने हार्दिक पंड्याला विजयापासून रोखले

अटलबिहारी वाजपेयी स्टेडियमवर संघर्षपूर्ण सामन्यानंतर यजमान लखनौच्याच चेहऱयावर विजयी हास्य फुलले. शेवटच्या 12 चेंडूंत विजयासाठी 29 धावांची गरज असताना हार्दिक पंड्या मुंबईला लखनौ जिंकून देईल असे वाटत होते, पण शार्दुल ठाकूर आणि आवेश खानने फक्त 16 धावा मोजल्या आणि मुंबईला विजयापासून 12 धावा दूर ठेवले. विजय मुंबईच्या आवाक्यात वाटत असताना आवेश खानने हार्दिक पंड्याला खेळवत लखनौला आपल्या घरच्या मैदानावर मोसमातला पहिला आवेशपूर्ण विजय मिळवून दिला. मुंबईच्या सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माला खेळवत 3 षटकांत केवळ 10 धावा मोजणारा दिग्वेश राठी लखनौच्या सनसनाटीपूर्ण विजयाचा मानकरी ठरला.

आयपीएलच्या चार सामन्यांत सर्वाधिक तीन अर्धशतकी खेळी करणाऱया मिचेल मार्शच्या 31 चेंडूंतील 60 धावांचा झंझावात, त्याला एडन मार्करमची 53 धावांची लाभलेली साथ आणि मोक्याच्या क्षणी आयुष बदोनी आणि डेव्हिड मिलरच्या फटकेबाजीने लखनौला 8 बाद 203 अशी जबरदस्त धावसंख्या उभारून दिली. हार्दिक पंड्याने 36 धावांत 5 विकेट घेत आपली आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरी साकारली असली तरी ती मुंबईसाठी फारशी फायद्याची ठरली नाही. लखनौच्या 204 धावांचा पाठलाग करताना मुंबई सहज बाजी मारणार असे चित्र उभे राहिलेले, पण शेवटच्या दोन षटकांत हार्दिक पंड्या आणि तिलक वर्मा आपल्या बॅटचा करिश्मा दाखवू शकले नाहीत. शार्दुलने 19 व्या षटकांत केवळ 7 धावा देत सामन्यात जान आणली. त्यामुळे शेवटच्या 6 चेंडूंत 21 धावा हव्या असताना पंड्याने पहिल्याच चेंडूवर षटकार खेचत मुंबईला विजयाची स्वप्ने दाखवली. दुसऱया चेंडूवर पंड्याने आणखी 2 धावा काढल्या. मग 4 चेंडूंत 13 धावांची गरज होती. तेव्हाच आवेशने पंड्याला सलग दोनदा चकवले आणि पाचव्या चेंडूवर अवघी एक धाव देत सामना लखनौच्या नावावर केला. पंड्याने 16 चेंडूंत नाबाद 28 धावा केल्या.

हार्दिक पंड्याची कमाल

आज लखनौला मार्श आणि एडन मार्करमच्या भागीने ताकद दिली. दोघांनी अर्धशतके ठोकत लखनौला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने नेले. पण पंड्याने निकोलस पूरन (12) आणि ऋषभ पंतला (2) लवकर बाद करून अडचणीत आणले. तरीही आयुष बदोनी आणि डेव्हिड मिलर यांनी लखनौला दोनशेसमीप नेले. पंड्याने 36 धावांत लखनौचा अर्धा संघ गारद करत त्यांचा धावांच्या वेगाला ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. अन्यथा लखनौची धावसंख्या आणखी फुगली असती.

सलामीची जोडी अपयशीच

अपयशी रोहित शर्मा दुखापतीमुळे मैदानाबाहेर बसला, पण तो नसल्याचा मुंबईला फारसा फरक जाणवला नाही. विल जॅक्स (5) आणि रायन रिकल्टन (10) हे दोघे सलामीवीर सलामी देण्यात अपयशी ठरले. सोबत दोघांना फटकेबाजीही करता आली नाही. 17 धावांत दोन विकेट गमावल्यानंतर रोहित शर्माच्या अनुपस्थितीत बढती मिळालेल्या नमन धीरने सूर्यकुमार यादवसह 69 धावांची भागी रचली. त्याने 3 षटकार आणि 4 चौकार खेचत 46 धावा ठोकून मुंबईच्या डावाला धीर दिला. सूर्याने संयमी खेळ करत केवळ एका षटकारासह 67 धावा वसूल करत मुंबईला विजयासमीप नेले. त्याने तिलक वर्माच्या साथीने 66 धावांची भागी केली. चार षटकांत 52 धावांची गरज असताना ही जोडी फुटली, पण विजय मुंबईच्या आवाक्यात होता. जो पंड्याला मिळवता आला नाही.