देवदर्शनासाठी अनंत अंबानींची 170 किलोमीटरची पदयात्रा, जामनगर ते द्वारका रोज 20 कि.मी. चालणार

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे धाकटे पुत्र अनंत अंबानी पदयात्रेमुळे चर्चेत आले आहेत. देवदर्शनासाठी त्यांनी 29 मार्चपासून जामनगर ते द्वारका अशी तब्बल 170 किलोमीटरची पदयात्रा सुरू केली आहे. गेल्या 9 दिवसांपासून ते रोज 20 किलोमीटर चालत आहेत.  वाटेत ते अनेकांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यांच्याशी गप्पा मारत असल्याचे चित्र आहे. दिवसा ते विश्रांती घेत असून रात्री पदयात्रा करत आहेत.

10 एप्रिल रोजी 29 वर्षीय अनंत अंबानी यांचा वाढदिवस असून त्याआधी म्हणजेच 8 एप्रिल रोजी ते द्वारकानगरीत पोहोचणार आहेत. पदयात्रेदरम्यान ते हनुमान चालिसा, सुंदरखंद आणि देवी स्तोत्र यांचे पठण करत आहेत. दरम्यान, दिवसा  वाहतुकीस अडथळा निर्माण होईल, तसेच उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे अनंत अंबानी यांनी रात्री पदयात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

पदयात्रेत बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्रीही सहभागी

अनंत अंबानी यांच्या पदयात्रेचा शुक्रवारी आठवा दिवस होता. या पदयात्रेदरम्यान बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्रीही सहभागी झाले. धीरेंद्र शास्त्री यांनी अनंत अंबानींसोबत अनेक किलोमीटर पदयात्रा केली. “आपण कितीही मोठे झाले असलो तरी आपले पाय जमिनीवर असले पाहिजेत”, असा संदेश धीरेंद्र शास्त्री यांनी या पदयात्रेतून दिला. “अनंत अंबानी यांच्या पदयात्रेत शक्ती आणि भक्तीही आहे. अनंत अंबानी सच्च्या मनाने द्वारकेच्या दरबारात नतमस्तक होणार आहेत. त्यांचा विश्वास बघण्यासारखा आहे. मीही या पदयात्रेत सहभागी झालो आहे. अनंत अंबानींवर भगवान द्वारकाधीश यांचे आशीर्वाद आहेत”, असे पंडित धीरेंद्र शास्त्री म्हणाले.