
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्यात आज बँकॉकमध्ये बैठक झाली. बांगलादेशातील हिंदूंसह अल्पसंख्याकांच्या सुरक्षेबाबत मोदी यांनी चिंता व्यक्त करताना तेथील सरकार अल्पसंख्याकांची सुरक्षा सुनिश्चित करेल अशी अपेक्षा व्यक्त केली. बिम्सटेक शिखर परिषदेच्या निमित्ताने दोन्ही नेत्यांची भेट झाली. गेल्या वर्षी पंतप्रधान शेख हसीना यांची बांगलादेशातून हकालपट्टी झाल्यानंतर ही पहिलीच बैठक होती.
मोदी आणि युनूस यांच्या भेटीबाबत परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. ते म्हणाले की, मोदींनी हिंदूंसह बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या सुरक्षेशी संबंधित हिंदुस्थानची चिंता अधोरेखित केली. परिस्थिती खराब करणारे कोणतेही वक्तव्य टाळले पाहिजे. लोकशाही, स्थिर, शांततापूर्ण, प्रगतशील आणि सर्वसमावेशक बांगलादेशसाठी हिंदुस्थानचे समर्थन असेल, असे मोदी यांनी सांगितले.