
वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा देण्यावरून केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या मित्र पक्षांत आता खटके उडायला लागले आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जेडीयू आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीमध्ये पक्षांतर्गत अस्वस्था वाढताना दिसत आहे. नितीश समर्थकांचे राजीनामा सत्र सुरू झाले आहे.
बिहार व आंध्र प्रदेशमध्ये मोठय़ा संख्येने मुस्लिम समुदाय आहे. त्यामुळे संसदेत वक्फ विधेयकाचे समर्थन करण्याची भूमिका जेडीयू आणि टीडीपीच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये वर्षअखेरीस विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार असून वक्फ विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय अंगलट येण्याची भीती पक्षातील काही नेत्यांना वाटत आहे. जेडीयू आमदार गुलाम गौस हे तर सुरुवातीपासूनच विधेयकाच्या विरोधात आहेत.
अल्पसंख्य सेलच्या पाचजणांनी नितीश यांची साथ सोडली
जेडीयू अल्पसंख्याक सेलचे राज्य सचिव मोहम्मद शाहनवाज मलिक, प्रदेश सरचिटणीस सई मोहम्मद, तबरेज सिद्दीकी अलिग, भोजपूरचे पक्षाचे सदस्य मोहम्मद दिलशान रैन आणि मोहम्मद कासिम अन्सारी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
टीडीपी नेते म्हणतात, नाइलाजास्तव पाठिंबा
नाइलाजास्तव वक्फ विधेयकाला पाठिंबा दिल्याचे काही टीडीपी नेत्यांचे म्हणणे आहे. कुठल्याही राज्यातील वक्फ बोर्ड या विधेयकावर खूश नसेल, कारण यातून त्यांचे अधिकार कमी होत आहेत. आमचाही विधेयकातील काही तरतुदींवर आक्षेप असल्याचे टीडीपीचे एक प्रमुख मुस्लिम नेते अब्दुल अजीझ यांनी म्हटले आहे.
जेडीयू सरचिटणीसांचा आंदोलनाचा इशारा
नितीशकुमार यांचे समर्थक आणि जेडीयू सरचिटणीस माजी खासदार गुलाम रसूल बलयावी यांनी मुस्लिम संघटनांनी संयुक्त संसदीय समितीला सुचवलेल्या सुधारणा दुर्लक्षित केल्याने नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला आहे. बिहारमध्ये या विधेयकाविरोधात एदारा-ए-शरीयाकडून आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे