
तब्बल 12 तासांच्या वादळी चर्चेनंतर वक्फ सुधारणा विधेयक राज्यसभेतही मंजूर करण्यात आले. विधेयकाच्या बाजूने 128 तर विरोधात 95 मते पडली. आता हे विधेयक राष्ट्रपतींकडे जाईल. त्यांची मंजुरी मिळाल्यानंतर त्याचे कायद्यात रुपांतर होईल. वक्फ विधेयकावरून अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशीही संसदेच्या दोन्ही सभागृहांत त्याचे पडसाद कायम होते. सोनिया गांधी यांनी विधेयक जबरदस्तीने मंजूर करण्यात आले, अशी टिप्पणी केल्याने प्रचंड गदारोळ उडाला. त्यामुळे दोन्ही सभागृहांतील कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले.
संसद अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेत कामकाज सुरू होताच विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी आणि निदर्शने सुरू केली. त्याच वेळी सोनिया गांधी यांच्या टिप्पणीवरून लोकसभा आणि राज्यसभेत सत्ताधाऱ्यांनी प्रचंड गदारोळ केला. सोनिया गांधी माफी मागा… माफी मागा… अशी घोषणाबाजी सुरू केली. तर विरोधकांनी अमेरिकेने हिंदुस्थानवर लादलेल्या अतिरिक्त शुल्कावरून घोषणाबाजी सुरू केली. या प्रकरणी विरोधी पक्षांनी संसदेच्या परिसरातही जोरदार आंदोलन केले. दरम्यान, राज्यसभेत अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी वीरेंद्र प्रसाद वैश्य आणि मिशन रंजन दास या दोघांना निरोप देण्यात आला. त्यांचा कार्यकाळ जूनमध्ये संपणार आहे.
वक्फ विधेयक मंजूर होणे ही मोठी सुधारणा – नरेंद्र मोदी
वक्फ सुधारणा विधेयक मंजूर होणे ही एक मोठी सुधारणा असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक्सवरून दिली. या कायद्यामुळे पारदर्शकता वाढेल आणि गरीब मुस्लिमांच्या हक्कांचे रक्षण होईल, असे मोदी म्हणाले. वक्फ मालमत्तांमध्ये वर्षानुवर्षे अनियमितता होती, ज्यामुळे विशेषतः मुस्लिम महिला आणि गरिबांचे नुकसान झाले. या कायद्यामुळे ही समस्या सुटेल, असेही त्यांनी नमूद केले.
वक्फबाबत सत्ताधाऱ्यांकडे विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरे नव्हती
वक्फ सुधारणा विधेयकाबाबत विरोधी पक्षांनी आपले मत मांडले. यात तर्क, भावना आणि वजन होते; परंतु विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरे सत्ताधाऱ्यांकडे नव्हती, असे काँग्रेसने म्हटले आहे. भाजपाच्या बाजूने अनेकांनी मते मांडली असली तरी चर्चेत सत्ताधारी हरले. 2013 मध्ये वक्फ विधेयकात सुधारणा करण्यात आली होती. त्यावेळी भाजपाने पूर्ण समर्थन का दिले, असा सवालही काँग्रेसने केला.
लोकसभा अध्यक्ष भडकले
वक्फ विधेयक जबरदस्तीने मंजूर करून घेतले, अशी टिप्पणी करणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सोनिया गांधी यांनी केलेल्या टिप्पणीचा उल्लेख केला. एका ज्येष्ठ सदस्याने कामकाजावर अशा प्रकारे सवाल करणे चुकीचे असून त्यांनी सभागृहाच्या मर्यादेचे पालन केले नाही, अशा शब्दांत बिर्ला यांनी संताप व्यक्त केला. काँग्रेस सदस्यांनी सभागृहात आपले म्हणणे मांडू देण्याची मागणी करत गदारोळ केला.