
गुजरातमधील जामनगर येथे बुधवारी जग्वार लढाऊ विमान अपघातात शहीद झालेल्या लेफ्टनंट सिद्धार्थ यादव (28) याचा 10 दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला होता. शुक्रवारी हरयाणातील रेवाडी येथील मूळ गावी शहीद जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सिद्धार्थचे वडील सुशील यादव यांनी आपल्या लेकाच्या चितेला अग्नी दिला. शहीद होण्यापूर्वी सिद्धार्थने आपल्या सहकाऱ्याला जीवनदान दिले. सिद्धार्थचा 10 दिवसांपूर्वी साखरपुडा झाला होता. अंत्यसंस्कारावेळी जिच्यासोबत सिद्धार्थचे लग्न होणार होते, ती सानियासुद्धा उपस्थित होती. सिद्धार्थचा मृतदेह पाहताच तिने टाहो फोडला. 2 नोव्हेंबर 2025 रोजी सिद्धार्थ आणि सानिया यांचे लग्न होणार होते.
सिद्धार्थची आई असल्याचा अभिमान
शहीद जवानाची आई सुशीला यादव यांना लेकाचा मृतदेह पाहून अश्रू अनावर झाले. त्यांनी रडत रडत आपल्या भावना व्यक्त केल्या. मला माझ्या मुलाचा सार्थ अभिमान आहे. माझ्या मुलाने देशाची सेवा करावी अशी माझी इच्छा होती. मला त्याची आई असल्याचा खूप अभिमान वाटतो. मी सगळ्यांना सांगू इच्छिते की, आपल्या मुलाबाळांना देशाची सेवा करण्यासाठी सैन्यात पाठवा, असे त्या माऊलीने सांगितले.
चार पिढ्या लष्करात
सिद्धार्थचे पणजोबा ब्रिटिशांच्या अधीन असलेल्या बंगाल इंजिनीअर्समध्ये काम करत होते. तसेच सिद्धार्थचे आजोबा निमलष्करी दलात कार्यरत होते. त्यानंतर त्याचे वडील आणि तो स्वतः देशसेवा करू लागला. अशा एकूण चार पिढ्यांपासून सैन्यात सेवा देण्याचे काम आहे.