मुंबई इंडियन्सचा पुन्हा फ्लॉप शो, लखनौ सुपर जायंट्सने 12 धावांनी केला पराभव

लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सवर 12 धावांनी विजय मिळवला. हा सामना लखनऊच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. लखनऊने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 बाद 203 धावा केल्या आणि मुंबईसमोर 204 धावांचे लक्ष्य ठेवले. परंतु मुंबईला 20 षटकांत 5 बाद 191 धावांपर्यंतच मजल मारता आली.

लखनौच्या फलंदाजीमध्ये मिशेल मार्शने 52 धावांची अर्धशतकी खेळी खेळली, तर निकोलस पूरनने 70 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. शेवटच्या टप्प्यात अब्दुल समदने 8 चेंडूत 22 धावांची खेळी करत संघाला 200 पार नेले. मुंबईकडून हार्दिक पांड्याने जबरदस्त गोलंदाजी करत 5 बळी घेतले. परंतु त्याला इतर गोलंदाजांकडून पुरेशी साथ मिळाली नाही.

204 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात खराब झाली. सलामीवीर विल जॅक्स (5) आणि रायन रिकेल्टन (10) बाद झाले. त्यानंतर सूर्यकुमार यादवने 43 चेंडूत 67 धावांची खणखणीत खेळी खेळली, परंतु त्याला तिलक वर्माकडून (32 धावा) फारशी साथ मिळाली नाही. शेवटच्या षटकात मुंबईला 22 धावांची गरज होती, परंतु अवेश खानने चांगली गोलंदाजी करत हार्दिक पांड्याला रोखले आणि लखनौला विजय मिळवून दिला.