
केवळ खून, मारामाऱ्या व रोमान्स असलेले मसाला चित्रपटच बॉक्स ऑफिसवर यशस्वी होतात हा समज दूर करून देशभक्तिपर व सुपरहिट चित्रपटांची मालिकाच मनोज कुमार यांनी फिल्म इंडस्ट्रीला दिली. फिल्मफेअरपासून ते पद्मश्री व दादासाहेब फाळके यांसारखे अनेक सर्वोच्च सन्मान मनोज कुमार यांना मिळाले. मात्र देशवासीयांनी बहाल केलेला ‘सच्चा हिंदुस्थानी’ हा पुरस्कारच मनोज कुमार यांच्यासाठी सर्वोत्तम आहे. मनोज कुमार यांनाही हाच पुरस्कार आवडेल!
जुन्या पिढीतील दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक मनोज कुमार यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीतील एक काळ गाजविणाऱ्या पर्वाचा अस्त झाला आहे. अखेरचा श्वास घेतला तेव्हा मनोज कुमार यांचे वय 87 वर्षे होते. केवळ देखणा नायक व उमदा अभिनेता एवढीच मनोज कुमार यांची ओळख नव्हती, तर फिल्म इंडस्ट्रीमधील एक प्रखर देशाभिमानी व्यक्तिमत्त्व म्हणून मनोज कुमार यांनी आपली छाप सोडली. देशभक्त कलावंत ही आपली प्रतिमा मनोज कुमार यांनी जाणीवपूर्वक निर्माण केली व ती जपलीदेखील. मनोज कुमार यांचे खरे नाव हरिकिशन गिरी गोस्वामी असे होते. मात्र तत्कालीन सुपरस्टार दिलीप कुमार यांच्यावरील अतीव प्रेमातून त्यांनी आपले नाव बदलले. 1949 साली प्रदर्शित झालेल्या ‘शबनम’ या चित्रपटात दिलीप कुमार यांचे नाव ‘मनोज’ असे होते. हा चित्रपट मनोज कुमारांना इतका आवडला की, त्यांनी तो अनेक वेळा पाहिला आणि लगोलग आपले हरिकिशन हे नाव सोडून ‘मनोज कुमार’ असे नामकरण करवून घेतले. मनोज कुमार यांचा जन्म झाला तो हिमालयाच्या कुशीत म्हणजे आता पाकिस्तानात असलेल्या एबटाबाद येथे; पण त्यांनी आपल्या कारकीर्दीच्या यशाचे शिखर गाठण्यासाठी निवड केली ती मुंबई व फिल्म इंडस्ट्रीची. फाळणीचे चटके सहन करून मनोज कुमार आपल्या कुटुंबासमवेत हिंदुस्थानात आले. काही दिवस दिल्लीतील
निर्वासित छावणीत
काढल्यानंतर दिल्लीतच त्यांचे सगळे शिक्षण व जडणघडण झाली. मात्र चित्रपटांविषयी असलेले आकर्षण त्यांना मायानगरी मुंबईत घेउैन आले. व्यवस्थेविरुद्धची चीड आणि संघर्ष करण्याचा विडा उचलण्याचे हेच धैर्य मनोज कुमार यांच्या चित्रपटांतही ओतप्रोत भरलेले दिसते. शहीद भगतसिंह हे तर त्यांचे प्रेरणास्रोतच होते. 1965 साली भगतसिंह यांच्या जीवनावर आधारित ‘शहीद’ हा देशभक्तिपर चित्रपट बनवला. खुद्द मनोज कुमार यांनीच या चित्रपटात भगतसिंह यांची भूमिका साकारली होती. हा चित्रपट तर सुपरहिट झालाच; पण यातील ‘ऐ वतन, ऐ वतन, हमको तेरी कसम,’ ‘सरफरोशी की तमन्ना’ आणि ‘मेरा रंग दे बसंती चोला’ ही देशभक्तिपर गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. खुद्द तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना हा चित्रपट खूप आवडला व त्यामुळेच चीन युद्धानंतर शास्त्रीजींनी ‘जय जवान जय किसान’ या आपल्या नाऱ्यावर चित्रपट निर्माण करण्याची विनंती मनोज कुमार यांना केली होती. हीच मध्यवर्ती कल्पना घेऊन मनोज कुमार यांनी ‘उपकार’ हा चित्रपट काढला. या चित्रपटाने मोठाच इतिहास घडवला. त्या चित्रपटातील ‘मेरे देश की धरती, सोना उगले उगले हिरे-मोती’, हे देशभक्तिपर गीत देशवासीयांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. आजही या गाण्याची लोकप्रियता तशीच कायम आहे. ‘क्रांती’, ‘पूरब और पश्चिम’, ‘रोटी कपडा और मकान’ असे अनेक
देशभक्तिपर चित्रपट
म्हणजे मनोज कुमार यांनी दिलेला अमूल्य ठेवाच आहे. तत्कालीन युद्धकाळात देशवासीयांमध्ये देशभक्ती व वीरश्रीचा संचार घडविण्यासाठी मनोज कुमार यांनी चित्रपटाच्या माध्यमाचा खुबीने वापर केला. अभिनेता व नायक म्हणून अनेक रोमँटिक चित्रपट मनोज कुमार यांच्या नावावर आहेत. याशिवाय मोहंमद रफी, मुकेश, महेंद्र कपूर इत्यादी गायकांनी गायिलेली व मनोज कुमार यांच्यावर चित्रित झालेली लोकप्रिय गाण्यांची संख्याही अफाट आहे. ‘मै ना भूलुंगा’, ‘इक प्यार का नगमा है’, ‘कोई जब तुम्हारा ह़ृदय तोड दे’, ‘पत्थर के सनम’, ‘कसमे वादे प्यार वफा’, ‘हाय हाय ये मजबुरी’, ‘पानी रे पानी तेरा रंग पैसा’, ‘चल संन्यासी मंदिर में’, ‘ये दुनिया एक नंबरी’, ‘जिंदगी की ना टूटे लडी’ अशी ही यादी खूप मोठी आहे. मात्र ‘भारत कुमार’ या नावाने नायक बनून मनोज कुमार यांनी जे देशभक्तिपर चित्रपट निर्माण केले, त्यामुळे देशवासीयांची त्यांच्याशी आपसूकच इतकी जवळीक निर्माण झाली की, ते जणू देशातील प्रत्येक कुटुंबाचे सदस्यच बनले. केवळ खून, मारामाऱ्या व रोमान्स असलेले मसाला चित्रपटच बॉक्स ऑफिसवर यशस्वी होतात हा समज दूर करून देशभक्तिपर व सुपरहिट चित्रपटांची मालिकाच मनोज कुमार यांनी फिल्म इंडस्ट्रीला दिली. फिल्मफेअरपासून ते पद्मश्री व दादासाहेब फाळके यांसारखे अनेक सर्वोच्च सन्मान मनोज कुमार यांना मिळाले. मात्र देशवासीयांनी बहाल केलेला ‘सच्चा हिंदुस्थानी’ हा पुरस्कारच मनोज कुमार यांच्यासाठी सर्वोत्तम आहे. मनोज कुमार यांनाही हाच पुरस्कार आवडेल!