Jalna News – लग्नाचा बस्ता बांधून आला आणि शेतात जाऊन स्वतःला संपवलं, 11 दिवसांवर होतं लग्न

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील डोमेगाव येथील तरुणाने लग्नाच्या अकरा दिवस आधीच लिंबाच्या झाडला गळफास घेत जीवन संपवले आहे. लग्नाचा बस्ता बांधून घरी आल्यानंतर तरुणाने टोकाचे पाऊल उचलले. त्यामुळे कुटुंबांर दु:खाचा डोंगर कोसळला असून गावासह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

राम पांडुरंग धाईत (27) असे या तरुणाचे नाव आहे. सदर घटना 3 एप्रिल रोजी घडली आहे. अंबड तालुक्यातील डोमेगाव येथील शेतकरी कुटुंबातील राम याने बी.ए.पर्यंत शिक्षण पूर्ण केले होते. त्याचे नुकतेच मंठा तालुक्यातील तळणी येथील एका मुलीशी15 एप्रिल रोजी लग्न होणार होते. लग्नाची पूर्व तयारी देखील सुरू झाली होती. गुरूवार 3 एप्रिल रोजी जालना शहरात लग्नाचा बस्ता देखील दोन्ही कुटुंबीयांच्या वतीने खरेदी करण्यात आला होता. अवघ्या 11 दिवसांवर लग्न येऊन ठेपले होते, त्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये लग्नाची गडबड सुरू होती. बस्ता बांधल्यानंतर राम व त्यांचे नातेवाईक सायंकाळी आपल्या मुळ गाव डोमेगाव येथे पोहचले. घरी आल्यानंतर राम हा घरात कोणाला काहीही न सांगता शेतात निघून गेला. यावेळी रामच्या भावजाईने राम नाराज असल्याचे पतीला सांगितले. त्यामुळे भावाने अनेकदा रामला मोबाईलवर संपर्क केला. मात्र फोन उचलला गेला नाही. त्यानंतर कुटूंबातील सदस्यांनी सर्वत्र शोध घेण्यासाठी धावपळ सुरू केली. अनेक ठीकाणी त्याचा शोध घेण्यात आला परंतु त्याचा पत्ता लागल नाही. अखेर स्वतःच्या शेतात गेल्यानंतर लिंबाच्या झाडाला रामने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले.

घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थ व नातेवाईकांच्या वतीने अंबड शहरातील उपजिल्हा रुग्णालयात रामला दाखल केल्यानंतर तपासणी करुण डॉक्टरांनी रामला मृत घोषीत केले. त्यानंतर शव विच्छेदन करण्यात आले. त्यानंतर राम धाईत यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, एक भाऊ, भावजाई, दोन पुतणे असा परिवार आहे. याबाबत अंबड पोलिसांना विचारले असता, गळफास घेण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे सांगीतले. तसेच अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.