
भरधाव स्कॉर्पिओ कारने रिक्षाला धडक दिल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. अपघातात रिक्षाचालकासह दोन महिला जखमी झाल्या आहेत. पश्चिम द्रुतगती मार्गावर गोरेगाव येथे गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात घडला. दारुच्या नशेत सीआयएसएफचा जवान ही गाडी चालवत होता. वनराई पोलिसांनी जवानाला अटक केली आहे.
धुंधराम यादव हा जवान मद्यधुंद अवस्थेत राँग साईडने गाडी चालवत होता. दारुच्या नशेत धुंधरामने विरुद्ध दिशेने येणाऱ्या रिक्षाला धडक दिली. या धडकेत रिक्षातील हाजरा इस्माईल शेख या महिलेचा जागीच मृत्यू झाला. महिलेच्या दोन मुलींसह रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. तिघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
अपघाताची माहिती मिळताच वनराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रिक्षा आणि कार ताब्यात घेतली. याप्रकरणी आरोपी जवानाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. आरोपीला बोरीवली कोर्टात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.