
अलीकडे आपल्याकडे सुपरफूड्सचा ट्रेंड हा मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. या वाढलेल्या ट्रेंडमध्ये चिया सीड्स आणि सब्जा दोन्ही बिया आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानल्या जातात. विशेषतः वजन कमी करण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी आणि शरीराचे पोषण करण्यासाठी वापरल्या जातात.
सब्जा बिया आणि चिया बिया या दोघांमधील सर्वात मोठा फरक म्हणजे हे दोन्ही बिया वेगवेगळ्या ठिकाणी आढळतात. चिया बियाण्यांना साल्विया हिस्पॅनिका बिया म्हणूनही ओळखले जाते, हे देखील एक परदेशी बियाण्यासारखे आहे. हे पिक प्रामुख्याने लॅटिन अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये घेतले जाते. या बिया लहान, काळ्या किंवा तपकिरी रंगाच्या असतात आणि त्यात भरपूर पोषक तत्वे असतात. सब्जा बियाणे ज्यांना गोड तुळशीचे बियाणे किंवा फालूदा बियाणे असेही म्हणतात. हे भारतात आढळणाऱ्या गोड तुळशीच्या वनस्पतीच्या बिया आहेत. सब्जा बिया देखील पोषक तत्वांनी समृद्ध असतात. चिया आणि सब्जा बियाण्यांपैकी कोणते जास्त फायदेशीर ठरेल जाणून घ्या सविस्तर
वजन कमी करण्यासाठी
चिया आणि सब्जा दोन्ही वजन कमी करण्यास मदत करतात कारण यामध्ये भरपूर फायबर असते. यामुळे आपले पोट बराच काळ भरलेले राहते. यामुळेच अतिरिक्त अन्न खाण्याची इच्छा कमी होते. तसेच सब्जाच्या बिया लवकर फुगतात, त्यामुळे पोट भरलेले राहते. चिया बिया या खूपच हळूहळू पचतात, त्यामुळेही आपल्याला बराच काळ भूक लागत नाही. बराच काळ भूक नियंत्रित करण्यासाठी चिया बिया अधिक फायदेशीर आहेत.
पचनासाठी फायदेशीर
चिया आणि सब्जा दोन्ही बियांमध्ये भरपूर फायबर असल्याने ते पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. सब्जा बिया आम्लपित्त, गॅस आणि बद्धकोष्ठतेपासून लवकर आराम देतात. चिया बिया हळूहळू पचतात आणि आतडे दीर्घकाळ निरोगी ठेवतात. गॅस, अॅसिडिटी किंवा अपचनापासून त्वरित आराम हवा असल्यास, सब्जा बिया सर्वोत्तम आहेत. तसेच आतड्यांचे आरोग्य सुधरण्यासाठी चिया सीड्स एक चांगला पर्याय आहे.
हाडे आणि दात मजबूत करण्यासाठी
कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस ने समृद्ध असलेल्या या दोन्ही बिया हाडांसाठी फायदेशीर आहेत. चिया बियांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे ते हाडे आणि दात मजबूत करण्यास मदत होते. हाडे आणि दात मजबूत करण्यासाठी चिया बिया अधिक फायदेशीर आहेत.
शरीर थंड करण्यासाठी
उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी सब्जा बिया हा सर्वोत्तम पर्याय आहे. सब्जा बिया शरीरातील उष्णता कमी करतात आणि शरीराला हायड्रेट ठेवतात. चिया बिया शरीराला जास्त थंड करत नाहीत. जर तुम्हाला उन्हाळ्यात आरोग्यदायी पेय हवे असेल तर सब्जा बियाणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)