Banana Peels Benefits- केळीची साल केराच्या डब्यात फेकताय, मग जरा थांबा! जाणून घ्या केळीच्या सालीचे उपयोग

आपल्या आरोग्यासाठी फळांचे सेवन करणे हे कायम हितावह आहे. रोज आहारात किमान एकतरी फळ हे असायलाच हवे. आरोग्यासाठी उत्तम असणाऱ्या फळांमध्ये केळी सुद्धा खूपच महत्त्वाची आहे. केळीमध्ये आढळणारे पोटॅशियम, फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्स शरीराला अनेक फायदे देतात. पण केळं खाऊन झाल्यानंतर, जे केळीचे साल आपण कचरा समजून फेकून देतो, ते साल त्वचेसाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरते.

केळीच्या सालींमध्ये त्वचेला बरे करण्याचे गुणधर्म असतात. या सालींमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असतात आणि ते त्वचेला नुकसान करणाऱ्या फ्री रॅडिकल्सपासून दूर ठेवतात. या साली त्वचेवर लावल्याने त्वचेचे सूर्याच्या नुकसानापासून संरक्षण होते. या सालींमध्ये फॅटी अ‍ॅसिड देखील असतात आणि ते त्वचेला हायड्रेशन देण्याचे काम करतात.

 

केळीची साल चेहऱ्यावर कशी लावायची?

केळीच्या सालीचा आतील भाग चेहऱ्यावर तसाच घासू शकतो. त्याची साल तुमच्या चेहऱ्यावर घासून 20 ते 25 मिनिटे ठेवा आणि नंतर चेहरा धुवून स्वच्छ करा. यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग कमी होण्यास मदत होते, तसेच आपला चेहराही उजळतो.

 

केळीच्या सालीचा फेस मास्क

त्वचेला उजळ करण्यासाठी हा फेस मास्क बनवता येतो. फेस मास्क बनवण्यासाठी तुम्हाला केळीची साल, मध आणि दही लागेल. केळीच्या सालीचे अर्धे छोटे तुकडे करा. त्यात एक-एक चमचा मध आणि दही मिसळून पेस्ट बनवा. हा तयार केलेला फेस मास्क चेहऱ्यावर 20 मिनिटे लावल्यानंतर, चेहरा धुवून स्वच्छ करा. त्वचा चमकते आणि चेहऱ्यावर साचलेली घाणही निघून जाते.

 

केळीच्या सालीचा स्क्रब
आपल्या चेहऱ्यावरील मृत त्वचा काढून टाकण्यासाठी, केळीच्या साली वापरून स्क्रब बनवणे सर्वात बेस्ट आहे. हे स्क्रब बनवण्यासाठी केळीच्या सालींचे छोटे तुकडे करा आणि त्यात अर्धा चमचा हळद घाला. त्यात थोडी साखर आणि मधही घाला. चांगले मिसळल्यानंतर, ही पेस्ट चेहऱ्यावर लावावी आणि हातांनी हळूवारपणे चोळावे. 2 ते 3 मिनिटे घासल्यानंतर, हे स्क्रब चेहऱ्यावर 10 मिनिटे तसेच राहू द्यावे.

 

केळी आणि केळीची साल
एका भांड्यात केळीचा तुकडा, केळीच्या सालीचे काही तुकडे आणि थोडे मध घालून पेस्ट बनवा. हा फेस पॅक चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटे ठेवा आणि नंतर धुवा. त्वचा उजळते आणि तेजस्वी दिसू लागते. या फेसपॅकपासून त्वचेला वृद्धत्वविरोधी गुणधर्म देखील मिळतात, ज्यामुळे त्वचा अकाली वृद्ध होत नाही. हा फेस पॅक आठवड्यातून एकदा लावता येतो.

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)