वादळी पावसाने पुण्याला झोडपले! झाडे पडली, रस्त्यांवर पाणी, वाहतूककोंडी

पुणे शहराला विजांच्या कडकडाटात सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले. सायंकाळी अचानक सुरू झालेल्या पावसामुळे पुणेकरांची तारांबळ उडाली. पावसाच्या जोरदार सरींमुळे रस्त्यांवर पाणी वाहू लागले होते. त्यामुळे काही भागांत वाहतूककोंडी झाली, तसेच दुचाकीस्वारांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत होती. जिल्ह्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली. खेड तालुक्यातील चासकमान धरण परिसरात झालेल्या पावसाने पिकांचे नुकसान झाले.

सकाळपासून ढगाळ वातावरणामुळे पुणेकर उकाड्याने हैराण झाले होते. मात्र, सायंकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह अचानक सुरू झालेल्या पावसामुळे पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. अवकाळी पावसामुळे शहरातील विविध भागांत अकरा ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या असून, बालेवाडी येथे एका ठिकाणी शेड पडून एकजण जखमी झाला आहे. शहरात आज शिवाजीनगर भागात 5.9, पाषाण 18.1, चिंचवड 5.5, एनडीए 4, कोरेगाव पार्क भागात 3.5, लवळे 7.5, वडगांवशेरी 7, हवेली 6.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात चक्राकार स्थिती निर्माण झाल्याने आर्द्रता तयार झाली आहे. बंगालच्या उपसागर, अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शुक्रवारीदेखील राज्यात काही ठिकाणी मेघगर्जना, विर्जाच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यानंतर राज्यात हवामान निरभ्र राहील, अशी शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.

अकरा ठिकाणी झाडपडी

सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटामुळे झालेल्या पावसाने शहरात 11 ठिकाणी झाडपडीच्या वर्दी अग्निशमन दलाकडे आल्या. औंध परिसरातील मेडिपॉइंट हॉस्पिटल रस्ता, बावधन येथील शिंदेनगर, हडपसर भागातील रामटेकडी बसस्टॉपजवळ रस्त्यावर, मगरपट्टा चौक रस्ता, मार्केटयार्ड येथील संदेश सोसायटी, हडपसर येथील किर्लोस्कर कंपनीमागे, हडपसर भागातील हुंदाई शोरूमजवळ, वारजे अग्निशमन केंद्र येथील चर्चसमोर, बाणेर येथील आंबेडकरनगर, कुमठेकर रोड येथील आवारे खानावळजवळ, हडपसर भागातील एसआरपीएफ ग्रुप नंबर एकजवळ झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. तर बालेवाडी येथे लोखंडी रोड पडून एकजण जखमी झाला.