
देशात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. रोज बलात्काराच्या घटना घडत आहेत त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. पुन्हा एकदा अशीच एक घटना बंगळुरू मधील केआर पुरम रेल्वे स्थानकाजवळ घडली. येथे मध्यरात्री एका 19 वर्षीय तरूणीवर दोन नराधमांनी बलात्कार केला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून महादेवपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 1 मार्च रोजी मध्यरात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पीडित तरूणी ही केरळमधील कट्टप्पाना शहरात कामाच्या ट्रेनिंगसाठी गेली होती. तेथून मंगळवारी ती पुन्हा आपल्या घरी येण्याससाठी निघाली होती. मंगळवारी रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास ती केआर पुरम रेल्वे स्थानकावर पोहोचली. तेथे तिचा भाऊ तिला घेण्यासाठी आला होता. त्यानंतर ती आणि तिचा भाऊ महादेवपुरा येथील एका रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी निघाले.
ते दोघे रेस्टॉरंटमध्ये जात असताना दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांचा पाठलाग करत त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी पीडितेच्या भावाला बळजबरीने बांधून ठेवले आणि त्याला मारहाण केली , तर दुसऱ्या हल्लेखोराने पीडितेला एका निर्जन ठिकाणी ओढून नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. यावेळी पीडिता मदतीसाठी ओरडू लागली. तेव्हा स्थानिक लोक तिच्या मदतीला आले. जमावाने हल्लेखोरांपैकी एकाला पकडून पोलिसांना याबाबत माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे दोन पथके घटनास्थळी पोहोचले. यानंतर त्यांनी एका हल्लेखोराला ताब्यात घेतले आणि दुसऱ्याचा शोध सुरू केला. अवघ्या काही तासांतच पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. आसिफ आणि सय्यद मुसहर असे या आरोपींची नावे आहेत. हे दोघेही कर्नाटकातील कोलार येथील रहिवासी आहेत. सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.