
कर्नाटकच्या सीमेवरील गावांमध्ये मराठी भाषेसाठी कुणी प्रयत्न करत असेल, आंदोलन करत असेल तर त्याला तडीपार केले जात आहे. हा मराठी भाषिकांवर अन्याय असून त्यांना न्याय देण्यासाठी आणि मराठी माणसाला सन्मानाने जगता यावे यासाठी, बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी आणि बिदरमध्ये राष्ट्रपती राजवट लावावी अशी मागणी आज शिवसेनेने लोकसभेत लावून धरली.
106 जणांनी प्राणांची आहुती देऊन मुंबईसह महाराष्ट्र मिळवला. परंतु, त्यावेळी बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी आणि बिदर हे मराठी भाषिक भूभाग महाराष्ट्रात आले नाहीत म्हणून तेव्हापासून तेथील मराठी भाषिक आंदोलन करत आहेत. मात्र, सातत्याने तेथील मराठी भाषिकांवर अन्याय होत असल्याचे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी सांगितले. 1969 साली हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आंदोलन केले. अटल बिहारी वाजपेयी यांनी पुढाकार घेऊन दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलावले. परंतु, कर्नाटकचे मुख्यमंत्री तेव्हा आले नाहीत. सर्वोच्च न्यायालयातही न्याय मिळत नाही. आता आंदोलनकर्त्या मराठी भाषिकांना तडीपार केले जात आहे. विधानसभेची निवडणूक लढवणाऱया शुभम शेळके नावाच्या कार्यकर्त्याला तडीपार करण्यात आले. हे लक्षात घेऊन बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी आणि बिदर या भागात राष्ट्रपती राजवट लागू करावी आणि मराठी माणसाला न्याय द्यावा, अशी मागणी अरविंद सावंत यांनी केली.