
विश्वविक्रमादित्य सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर क्रिकेटपटू बनला. स्थानिक क्रिकेटमध्ये तो गोवा संघाकडून, तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतोय. मात्र आता सचिची लेक सारा तेंडुलकर हिनेही क्रिकेटमध्ये एण्ट्री केली आहे. तिने ‘ग्लोबल इ क्रिकेट प्रीमियर लीग’मध्ये (जीईपीएल) मुंबईचा संघ विकत घेतला आहे. ‘ग्लोबल ई-क्रिकेट प्रीमियर लीग’नेच ही घोषणा केली. मुंबईच्या संघाची मालकीण बनल्यानंतर सारा तेंडुलकर म्हणाली, ‘वडील सचिन तेंडुलकर यांच्यामुळे आमच्या रक्तातच क्रिकेट आहे. त्यामुळे क्रिकेट हा माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे. ‘ग्लोबल ई-क्रिकेट प्रीमियर लीग’मध्ये संघ खरेदी करण्यासाठी मी उत्सुक होते. मुंबईच्या संघाची मालकीण होणं, हे स्वप्न आता सत्यात उतरलं आहे. माझे क्रिकेटबरोबरच मुंबईवरही प्रेम आहे. त्यामुळे मुंबई संघाची मालकीण होणं हा माझ्यासाठी खऱ्या अर्थाने संस्मरणीय क्षण होय.’